
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी व्हावा असा निर्धारच इंडिया आघाडीतील पक्षांनी केला आहे काय, अशी शंका येते. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी आणि अब्दुल्ला परिवाराचा नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात जागा वाटपावरून वाजले आणि त्यामुळे आता दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुपकार अलायन्सचा या बरोबरच बोऱ्या वाजला आहे.
गुपकार अलायन्स म्हणजे काश्मिरातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आघाडी आहे आणि त्यात पीडीपी आणि नॅ. कॉ. हे दोन्ही पक्ष भागीदार आहेत. पण अनंतनाग जागेवरून तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे आणि नॅ. कॉ. चे उमर अब्दुल्ला यांनी पीडीपीला त्यांची जागा दाखवली आहे. तर पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही अनंतनागची जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे, अशी भूमिका स्वीकारली आहे. मुळात काँग्रेससह या साऱ्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांना पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडायची होती की स्वतःचा स्वार्थ साधायचा होता, हा आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. नॅ. कॉ. काय किंवा पीडीपी काय, हे दोन्ही पक्ष परिवारवादी आहेत आणि सत्ता मिळाली, तर आपल्या कुटुंबाला त्याचा लाभ व्हावा, इतक्या क्षुद्र हेतूने ते एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात वादविवाद व्हावा आणि नंतर आघाडीचा बोऱ्या वाजावा, हे विधिलिखितच होते.
इंडिया आघाडीकडे असा सर्वमान्य नेता नाही की ज्याचे सारे पक्ष ऐकतील. त्यामुळे इंडिया आघाडीचा हा राजकीय तमाशा सुरू आहे आणि त्याला कुणीच रोखू शकत नाही. या खेळाला तमाशा शब्द वापरणे काहीसे कठोर वाटेल पण सारे पक्ष आणि त्यांची रोजची जागावाटपाची धडपड आणि एकेका जागेसाठी चालू असलेले जागावाटपाचे गुऱ्हाळ पाहिले की या हा शब्द यथोचित वाटतो. मुफ्ती यांनी अब्दुल्ला यांना म्हटले आहे की, आमच्या पक्षाची स्थिती खराब असली तरीही तो जम्मू आणि काश्मिरातून बाहेर झालेला नाही. तर ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले होते की, एकेका जागेसाठी अशा वाटाघाटी होतील हे मला माहीत असते तर मी या आघाडीत सामील झालोच नसतो. आता असे शब्द वापरत असलेले अब्दुल्ला निवडणुका झाल्यानंतर आघाडीत राहतील का, याची शंका आहे. राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाला एकही जागा मागण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांनी पीडीपीला जागा दाखवली आहे. या सर्वांचा परिणाम असा होणार आहे की, इंडिया आघाडी काश्मीरमध्ये तरी संपुष्टात आली आहे. इंडिया आघाडीतील पक्ष निवडणुका होण्याअगोदरच एकमेकांच्या उरावर बसत असतील तर निवडणुका झाल्या आणि त्यांची सत्ता खरोखरच आली तर (ती शक्यताच फार कमी आहे) देशाचा काय विकास करणार आणि देशाला काय नेतृत्व देणार, याची शंका सामान्य मतदाराच्या मनात आहे.
पंतप्रधान मोदी यांना हटवण्याचा निर्धार करून त्यांनी आघाडी बनवली खरी पण अगोदरच ते इतकी भांडणे करत असतील तर देशाला त्यांची भांडणेच पाहत बसावी लागतील. गुपकार डिक्लेरेशनचीही कश्मीरमध्ये वाट लागली आहे. तो मसुदाही आता समुद्रात सोडून देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसकडे आता या भांडखोर आणि परिवारवादी पक्षांना आवरण्याची ताकद उरलेली नाही. त्यामुळे इंडिया आघाडी ही आता बनाना स्टेट म्हणजे अराजकाच्या स्थितीत निवडणुका होण्याच्या अगोदरच सापडली आहे. ओमर अब्दुल्ला यांनीच गुपकार डिक्लेरेशन मोडीत काढल्याचा आरोप मेहबुबा यांनी केला असला तरीही अब्दुल्ला यांनी जवळपास आघाडीत राहणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी फक्त तशी घोषणा केलेली नाही, इतकेच काय ते. पण अर्थ तोच आहे. इतके विसंवादी पक्ष एकत्र येऊन मोदी यांना काय टक्कर देणार? हा सवाल आता जनतेच्या मनात आहे.
लोकांसमोर मोठ्या मोठ्या तत्त्वज्ञानाच्या बाता मारणारे हे संकुचित आणि फक्त कुटुंबापुरते असलेले परिवारवादी पक्ष एकत्र आले काय किंवा वेगळे झाले काय, ते मोदी यांच्या लोकप्रियतेपुढे काहीही करू शकत नाहीत. मोदी यांना टक्करही देऊ शकत नाहीत. मग त्यांना हटवण्याची बाब तर त्यांच्या क्षमतेच्या बाहेर आहे. मेहबुबा यांनी आम्ही गुपकार आघाडी तोडली नाही तर ती अब्दुल्ला यांनी तोडली आहे, असा स्वतःचा खुलासा केला आहे. दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले असल्याने त्या आघाडीचा आता पुरता बोऱ्या वाजला आहे, हे जगजाहीर आहे. आपण आघाडी तोडली नाही, हे पाप आपले नाही, हे सांगण्याची स्पर्धा आता या पक्षांत लागली आहे. सत्य हे आहे की इंडिया आघाडी हा एक आता विनोद झाला आहे.
आप दिल्लीत स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहे, बसपा यात कुठेही नाही, सपा आणि काँग्रेसचे पटत नाही तरीही इंडिया आघाडी हा गट आहे, असे म्हणणे म्हणजे विनोद उरला आहे. स्वार्थासाठी आणि भ्रष्टाचारातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी एकत्र आलेली ही प्रादेशिक पक्षांची मोट आहे. ती फार काळ टिकत नसते. हेच तर मेहबुबा आणि उमर अब्दुल्ला यांना सांगायचे असावे. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर दोन्ही पक्षांचे आणि त्याद्वारे इंडिया आघाडीचे नुकसान होणार आहे. तरीही कुणी असा विचार करत असेल की इंडिया आघाडी देशात बहुमत मिळवणार आहे, तर त्याला आशावादी असल्याचे पारितोषिक द्यावे लागेल.