
- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
'मासूम’ हा शेखर कपूरचा पहिला सिनेमा. नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, सुप्रिया पाठक, तनुजा आणि सईद जाफरी असलेल्या या चित्रपटात जुगल हंसराज, आराधना आणि ऊर्मिला मातोंडकर (आताची सौ. मोहसीन अख्तर मीर!) बालकलाकार म्हणून दिसली होती. पटकथा, संवाद आणि गीते होती गुलजार यांची तर संगीत पंचमदांचे!
एकतिसाव्या फिल्मफेयर समारंभात ‘मासूम’ला ५ पारितोषिके मिळाली. समीक्षकांचे ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पारितोषिक शेखर कपूरला, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ नसिरुद्दीनला, ‘सर्वोत्कृष्ट संगीतकार’ पंचमदांना ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ ज्ञानपीठ विजेते ‘गुलजार’ यांना, तर ‘सर्वोत्कृष्ट गायिका’ म्हणून आरती मुखर्जी यांना मिळाले.
‘मासूम’ एरिक सेगेल यांच्या ‘Man, Woman & Child’ या मानवी जीवनातील गुंतागुंतीचे नाट्य मांडणाऱ्या कादंबरीवर बेतला होता! कादंबरी इतकी प्रभावी होती की, तिच्यावर १९८३ला किमान तीन चित्रपट आले. पहिला त्याच नावाचा इंग्रजी चित्रपट, दुसरा - ‘मासूम’ नावाचा हिंदी आणि तिसरा ‘कभी अलबिदा ना कहना’ नावाचा उर्दू (पाकिस्तानी) चित्रपट. तेलुगूत तो ‘इलालू प्रीयुरालू’ या नावाने तर मल्याळममध्ये ‘ओलंगल’ नावाने येऊन गेला! त्यानंतर १९८४ला सोफन सोफियान यांनी सिनेमाची इंडोनेशियन आवृत्ती काढली. याच कथेने टर्कित ‘बीर अक्सम उस्तु’ नावाचा सिनेमा दिला. तमिळमध्ये १९८७ला ‘पु पुवा पुथीरुक्कू’ या नावाने, तर १९९८ला सलमान खान आणि ट्विंकल खन्नाला घेऊन पुन्हा ‘जब प्यार किसीसे होता हैं’ नावाने रिमेक निघाला.
हिंदीतील कथानक असे होते. देवेंद्रकुमार मलहोत्रा (नसिरुद्दीन), पत्नी इंदू मलहोत्रा (शबाना) आणि त्यांच्या मुली ‘पिंकी’ (ऊर्मिला मातोंडकर) आणि ‘मिनी’ (आराधना श्रीवास्तव) दिल्लीत सुखाने राहत असतात. नसिरुद्दीनला एक पत्र येते आणि त्यांचे सगळे जीवन घुसळून निघते. पत्रात नसिरुद्दीनच्या मित्राने कळवले असते की, नैनितालमध्ये त्याच्या सुप्रिया पाठकशी घडून गेलेल्या एका प्रेमप्रकरणातून त्याला राहुल नावाचा मुलगा झालेला असतो आणि भावनाचा मृत्यू झालेला असतो. शाळेने मुलाचा ‘लोकल गार्डियन’ म्हणून त्या मित्राला ‘राहुलला घेऊन जा’ असा आदेश दिलेला असतो.
नसिरुद्दीन हतबल होतो. तो सगळे भीतभीत इंदूला सांगतो. तिला प्रचंड धक्का बसतो. नाईलाज असल्याने नसिरुद्दीन राहुलला घरी आणतो. हेच आपले कुटुंब आहे हे माहीत नसलेला राहुल छोट्या मुलींबरोबर घरात रमतो. मात्र शबानाला त्याची उपस्थिती असह्य होत जाते.
मानसिक ताण सहन न होऊन शेवटी नसिरुद्दीन मुलाला नैनितालच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचे ठरवतो. राहुल अनिच्छेने तयार होतो. प्रवेश मिळाल्यावर राहुलला नसिरुद्दीन हेच आपले वडील असल्याचे कळते आणि त्याचे भावविश्व उद्ध्वस्त होते. स्वत:चे नाकारलेपण सहन न होऊन तो घरातून पळून जातो.
पोलीस तपासानंतर सापडलेल्या राहुलला पोलीस घरी घेऊन येतात, तेव्हा तो ‘हेच माझे वडील आहेत हे आपल्याला माहीत असल्याचे’ शबानाला सांगतो. इंदूला त्या निरागस जीवाच्या वेदना जाणवतात. तिच्यातील आई जागी होऊन ती त्याचा स्वीकार करते, त्याचे नैनितालला जाणे रद्द करते आणि नसिरुद्दीनला मनापासून माफ करते.
सिनेमात अनेक हळुवार, हृदयस्पर्शी प्रसंग होते ज्यात शबाना, नसिरुद्दीन आणि जुगल यांच्यापैकी कुणाचा अभिनय श्रेष्ठ हे ठरवणे केवळ अशक्य वाटते. जेव्हा नसिरुद्दीन राहुलला नैनितालला ठेवायचे ठरवतो, तेव्हा प्रवेश मिळाल्यावर, शाळा सुरू होईपर्यंत २ दिवस, ते दोघेच नैनितालला राहतात, फिरतात, खेळतात. निरागस राहुलला नसिरुद्दीनचे वात्सल्य जाणवते. तो निष्पापपणे त्याला विचारतो, ‘क्या मैं आपको पापा बोल सकता हुं?’ यावर काय उत्तर द्यावे हे नसिरुद्दीनला कळत नाही. त्याची संभ्रमात पडलेली, तणावग्रस्त मन:स्थिती गुलजार यांनी एका गाण्यात फार सुंदरपणे मांडली होती. दोघे पितापुत्र नैनितालच्या निसर्गरम्य परिसरात फिरत असताना हे गाणे पार्श्वभूमीवर वाजत राहते.
अनुप घोषाल आणि लतादीदीच्या आवाजात सिनेमाची थीमच सांगणाऱ्या त्या गाण्याचे शब्द होते - ‘तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं... तेरे मासूम सवालोंसे, परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं...’ एक उमलते जीवन ‘आपलाच अंश’ म्हणून समोर आल्यावर ‘मी आनंदी होऊ की दु:ख करू तेच कळत नाहीये. त्या लहानग्याच्या निरागस प्रश्नाचे काय उत्तर देऊ या विचारानेच किती वेदना होत आहेत’ असे नसिरुद्दीनचे मन म्हणत असते.
‘जीनेके लिए सोचाही नहीं, दर्द संभालने होंगे... मुस्कुरायें तो मुस्कुरानेके, कर्ज़ उतारने होंगे... हो मुस्कुराऊँ कभी, तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज़ रखा है!’ जणू त्याचे अस्वस्थ, घायाळ मन आयुष्याला विचारते आहे, ‘एका हळव्या क्षणी घडून गेलेले, अनावरपणे मनाचा बांध फुटलेले प्रेम, त्यातून एका निरागस जीवाचा जन्म, हे सगळे किती अकल्पित होते! त्यातून आयुष्यात किती गुंतागुंत निर्माण होईल, याची काहीच कल्पना नव्हती ना! आणि आता त्या निष्पाप जीवाचा त्याच्या नात्याचा हक्क मागणारा प्रश्न! मी उत्तर तरी काय देणार?’ ‘क्षणभराच्या एका हास्याची किमत सुखाचा संसार उद्ध्वस्त करून चुकती करावी लागेल का?’ असेच जणू तो देवाला विचारतो आहे.
कुणाशी जीवाभावाचे नाते निघावे, त्याचा अतीव आनंद व्हावा आणि पाठोपाठ न सांगता येणाऱ्या दु:खाचा आवंढाही गिळावा लागावा! मला अकल्पित सुख मिळावे, पण तेही दु:खाच्या सावलीतच का? असे प्रश्न नसिरुद्दीनला पडले आहेत. तीच त्याची आयुष्याबद्दलची तक्रारही आहे! ज़िंदगी तेरे गमने हमें, रिश्ते नए समझाये... मिले जो हमें धूपमें मिले, छाओंके ठंडे साये... तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी...
मनाचे आभाळ अगदी भरले आहे, दु:ख आणि आनंद एकाच वेळी इतके दाटून आले आहे की कधीही मनाचा बांध फुटू शकतो. अश्रूंची धार लागू शकते ! आज जरी आयुष्याने ओंजळीत आनंद ओतलाय तरी उद्या कदाचित त्यासाठी झुरावे लागेल. स्वत:च त्याला सोडून कायमचे दूर जावे लागेल. मग तर दु:ख व्यक्तसुद्धा करता येणार नाही. ‘आज अगर भर आई है, बूंदे बरस जाएगी... कल क्या पता इनके लिए, आंखे तरस जाएंगी... हो जाने कब गुम हुआ, कहाँ खोया, एक आँसू छुपाके रखा था... हो तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी हैरान हूँ मैं, हो ओ हैरान हूँ मैं’
मानवी जीवनाच्या नाट्यातील कितीही गुंतागुंतीची भावना असली तरी ती दोन-तीन कडव्यात सहज मांडू शकणारे गुलजार किती दुर्मीळ कवी आहेत हे त्यांचे प्रत्येक गाणे नव्याने जाणवून देते. अजून पाचच महिन्यांनी नव्वदीत प्रवेश करणाऱ्या या महान कवीच्या गाण्यांचा आस्वाद आताच घेणे म्हणूनही महत्त्वाचे!