
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत एनडीए सरकारला लवकरच दहा वर्षे पूर्ण होतील. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत. येत्या निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’ असा संकल्प स्वत: पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. दहा वर्षे सत्तेवर असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात इंडिया नावाची विरोधी पक्षांची आघाडी भक्कम होण्याऐवजी इंडियातील दिग्गज नेते एकापाठोपाठ भाजपाच्या छावणीत दाखल होत आहेत. ज्या पक्षात दोन-चार दशके काढली, ज्या पक्षाने राज्यात व केंद्रात त्यांना सत्तेची पदे दिली, त्याच पक्षाला राम-राम ठोकून मोठ-मोठे नेते भाजपामध्ये दाखल होत आहेत. विरोधी पक्षात आणखी काळ (कुढत) बसण्याऐवजी या सर्वांना भाजपा अधिक सुरक्षित पक्ष वाटतो आहे. आपल्या भविष्यासाठी भाजपाच योग्य आहे, असा विश्वास विरोधी पक्षांतील नेत्यांना वाटू लागला आहे. एकदा कमळ हाती घेतल्यावर किंवा एनडीएमध्ये सामील झाल्यावर भाजपामध्ये मान-सन्मान व प्रतिष्ठा मिळते, याची सर्वांना जाणीव झाली आहे.
भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेस पक्षातील अनेक जण रांगेत उभे आहेत. तसेच अनेक जण अजून द्विधा मन:स्थितीत आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे चाळीस आमदार घेऊन भाजपाबरोबर गेले. नंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार घेऊन भाजपाच्या साथीला गेले. आता काँग्रेसचे अशोक चव्हाण थेट भाजपामध्येच दाखल झाले. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत हे सर्व नेते, आमदार, कुठे होते? गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात चारही प्रमुख पक्ष सत्तेवर आले व भाजपा वगळता सर्वच प्रमुख पक्षांची तोडफोड झाली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर अक्षरश: दुभंगले. महाराष्ट्रात जी राजकीय घुसळण झाली आहे ती थक्क करणारी आहेच, पण मतदारांची मती गुंग करणारी आहे. एक मात्र नक्की की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी व त्यांच्यासोबत उठाव केलेल्या खासदार-आमदारांनी व कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींचे उत्तुंग नेतृत्व मान्य केले आहे. नरेंद्र मोदी या दोन शब्दांत एवढे अचाट व अफाट सामर्थ्य आहे की, त्यावर विश्वास ठेवून हे सर्व नेते भाजपाकडे आकर्षित होत आहेत. ‘भाजपा आवडे सर्वांना’ अशी मानसिकता सर्वत्र दिसून येत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे धडाकेबाज कार्य पाहूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केंद्रात कॅबिनेटमंत्रीपद दिले. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास संपादन करण्यात राणेसाहेब यशस्वी झाले. स्वत: नारायण राणे, त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे असे सारे कुटुंबीय भाजपाची भूमिका सतत परखडपणे व रोखठोकपणे मांडत असतात. भाजपाचा विस्तार व्हावा यासाठी राणे परिवाराने अक्षरश: वाहून घेतले आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला व लगेचच त्यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारीही दिली, महाराष्ट्रातून त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवडही झाली. आपण भाजपामध्ये का गेलो, याची कारणे त्यांनी सांगितलेली नाहीत. पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत भाजपा प्रत्येक निवडणूक जिद्दीने लढते. प्रत्येक निवडणुकीत पक्षाबाहेरील दिग्गज नेत्यांचे भाजपामध्ये प्रवेश होतच असतात. त्यांचा मानसन्मान राखला जातो म्हणूनच अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपाचे आकर्षण आहे.
अन्य पक्षांतून भाजपामध्ये कोणी गेले की लगेचच त्यांच्या मागे ईडी किंवा इन्कम टॅक्सची सुरू असलेली चौकशी बंद होते अशी चर्चा सुरू होते. पण ईडी, इन्कम टॅक्स किंवा सीबीआयच्या नोटिसा गेल्या म्हणून सर्वच जण काही आपला पक्ष सोडून लगेच सत्ताधारी पक्षात जात नाहीत. दुसऱ्या पक्षाच्या नेतृत्वाबाबत विश्वास वाटला, तरच हे पक्ष बदल होत असतात. अशोक चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण (नानासाहेब) हे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रात गृहमंत्री होते. पक्षाने एवढे सारे दिल्यानंतरही त्यांना भाजपामध्ये जावेसे वाटले, याचे काँग्रेस पक्षाने चिंतन करायला नको का?
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हे एप्रिल २०२३ मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये आले. २५ नोव्हेंबर २०१० ते १ मार्च २०१४ ते मुख्यमंत्री होते. २ जून २०१४ ला यूपीए सरकराने आंध्र प्रदेशचे विभाजन केले, त्याच्या निषेधार्ह किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. नंतर स्वत:चा पक्ष काढला, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. मग २०१८ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आता ते भाजपात आहेत. नवज्योत सिद्धू यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सन २०२१ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा व नंतर काँग्रेसचा राजीनामा दिला. स्वत:चा पंजाब लोक काँग्रेस या नावाचा पक्ष काढला. सप्टेंबर २०२२ मध्ये हा पक्षच त्यांनी भाजपामध्ये विलीन करून टाकला. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनीही मे २०२२मध्ये भाजपात प्रवेश केला.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी मार्च २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केला. ऑक्टोबर १९९९ ते मे २००४ ते मुख्यमंत्री होते. डिसेंबर २००४ ते मार्च २००८ राज्यपाल होते. मे २००९ ते ऑक्टोबर २०१२ ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश केला. १९९४ मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. २००५ मध्ये ते काँग्रेसमध्ये परतले. सन २००७ ते २०१२ दरम्यान ते मुख्यमंत्री होते.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मे २०१६ मध्ये आठ आमदारांसह भाजपात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना मार्च २०१२ ते जानेवारी २०१४ ते मुख्यमंत्री होते. उत्तराखंड व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांनी रोहित शेखर या त्यांच्या मुलासह जानेवारी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. सन १९७६ ते १९८९ या काळात ते उत्तर प्रदेशचे तीन वेळा, तर सन २००२ ते २००७ या काळात उत्तराखंडचे तीन वेळा ते मुख्यमंत्री होते. ऑगस्ट २००७ ते डिसेंबर २००९ या काळात ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते. अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी डिसेंबर २०१६ मध्ये ३२ आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश केला. १ जुलै २०१६ पासून खंडू सत्तेवर होते. मुळात ते काँग्रेसचे होते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश खट्टर हे भाजपामधून काँग्रेसमध्ये गेले व नंतर काँग्रेसमधून भाजपामध्ये परतले. भाजपाने उमेदवारी नाकारल्यामुळे ते २०२३ मध्ये काँग्रेसमध्ये गेले होते.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी त्यांचा झारखंड विकास मोर्चा हा पक्ष ११ फेब्रुवारी २०२० रोजी भाजपात विलीन केला. बाबूलाल मरांडी हे नवनिर्मित झारखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर २००० ते मार्च २००३ ते मुख्यमंत्री होते, तेव्हा ते भाजपामध्ये होते. सप्टेंबर २००६ मध्ये त्यांनी भाजपा सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला. केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री एन. बिरेंद्र सिंग, जतीन प्रसाद, आरपीएन सिंग, हिमंता बिस्वा सरमा, सुवेंदू अधिकारी, खुशबू सुंदर, सतपाल महाराज, रिता बहुगुणा, जगदंबिका पाल, गौरव भाटिया, अशा अनेक दिग्गजांना भाजपाने पक्षात व सरकारमध्ये मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान दिले आहे.