Monday, May 5, 2025

कोलाजसाप्ताहिक

Poems : काव्यरंग

Poems : काव्यरंग

रविवारच्या दिवशी...

रविवारच्या दिवशी आम्ही असतो घरी बिच्चारी आई वैतागून जाते भारी... झोप नाही संपत सूर्य डोकावला तरी ब्रश करण्यासाठी आई कुरकुर करी... टी.व्ही. पाहात पाहात चालू असतो होमवर्क पेपरमधील कोडी सोडविताना बाबा होतात गर्क... वह्या पुस्तकांनी भरते नुसते घर बाबांच्या पेपरची त्यात पडते भर... दुपारी मित्रासंगे मैदानी जमे मेळ सायंकाळपर्यंत चाले क्रिकेटचा खेळ... रविवारच्या दिवशी मज्जाच मज्जा रविवार वाटतो जणू वारांचा राजा... - रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ.

बाप...

बोलतात सगळे बापावर फार कमी लिहिलं जातं बापावर... स्तुती करण्यास शब्दच नाहीत बाप एक चैतन्य मूर्ती आहे... कोणालाही न दिसणार धीर आहे बाप एक आधार आहे... सताड उघडे राहिलेले दार आहे बाप भीतीच्या अंधारतला दिवा आहे... बाप तळपत्या उन्हातली हवेची झुळूक आहे... बाप नाही लुसलुशीत साय तो दुधातला अस्सल खमंग स्वाद आहे... आईचे डोळ प्रेमाचे अश्रू अन् बापाचे डोळे विश्वासाचे दवबिंदू आहे... आई झुळझूळ वाहणारी नदी, बाप खोल शांत वाहणारा झरा आहे... राग खोटा त्याचा अंतरिचा भाव मात्र अगदी खरा आहे... - अपर्णा तांबे
Comments
Add Comment