Friday, May 9, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

Be Positive : बी पॉझिटिव्ह

Be Positive : बी पॉझिटिव्ह
  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

'एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाची पटकथा, संवाद व दिग्दर्शन प्रसाद खांडेकरचे आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रेमधून त्याचे दर्शन प्रेक्षकांना सुखावणारे असते. विनोदाचे अचूक टायमिंग त्याला असल्याने सध्या तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे.

बोरिवलीच्या चोगले हायस्कूलमधून त्याचे शालेय शिक्षण झाले. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन यामध्ये तो भाग घ्यायचा. शाळेतील क्रीडास्पर्धेत तो हिरिरीने भाग घ्यायचा. कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात त्याचे पुढील शिक्षण झाले. तिथे त्याने एकांकिकेचा ग्रुप बनविला. ‘मराठी कलावंत’ नावाचा त्याने ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात होते.

जेव्हा कॉलेजमधून तो एकांकिका करू लागला, तेव्हाच त्याला अभिनयाची गोडी लागली. काही एकांकिकेचे त्याने लेखन, दिग्दर्शन केले. अभिनेता व दिग्दर्शक संतोष पवार यांच्या ‘आम्ही पाचपुते’ या व्यावसायिक नाटकात सर्वप्रथम त्याने अभिनेता म्हणून काम केले. त्यानंतर त्याने एक व्यावसायिक नाटक ‘पापा जाग जायेगा आणि या पडद्याआड’ दिग्दर्शित केले. त्यामध्ये अभिनेत्री वनिता खरात होती. कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाच्या समोर बसेरा नावाचा स्टुडिओ होता. तेथे ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक# नावाच्या मालिकेचे शूटिंग चालत असे. राजेश देशपांडे दिग्दर्शित या मालिकेत अभिनेत्री निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळे ही जोडी होती. त्यावेळी त्याने दिग्दर्शक राजेश देशपांडेकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटात त्याने अभिनय केला. एकांकिका, प्रायोगिक नाटके, व्यावसायिक नाटके, मालिका व आता चित्रपटाचे दिग्दर्शन असा त्याचा प्रवास झाला.कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा या दोन मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. प्रेक्षक त्याला ओळखू लागले. हा त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. कॉमेडीची बुलेट ट्रेननंतर ‘शोधा अकबर’, ‘कानांची घडी हातावर बोट’ या व्यावसायिक नाटकात त्याने अभिनय केला. २०१९ ला सोनी या मराठी वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सुरू झाला. त्यामध्ये प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, समीर चौघुले हे तिघे कॅप्टन होते व त्याच्या मार्गदर्शनाखाली नवीन मुलांची स्पर्धा सुरू झाली. त्यापासून महाराष्ट्राची हास्यजत्राची ट्रेन जी सुस्साट वेगाने निघाली ती आजतागायत धावत आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी प्रसादला मिळाली. या अगोदर ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटात प्रसादने लेखन व अभिनय केला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले. जवळ जवळ दोन वर्षे त्याने स्क्रिप्टवर काम केले. दिग्दर्शनाचा पहिलाच चित्रपट असल्याने पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय त्याने घेतला. या आपल्या पहिल्याच चित्रपटात त्याच्या सहकलाकारांना देखील त्याने घेतले. नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, भाऊ कदम हे या चित्रपटात आहेत. दोन आठवडे झाले हा चित्रपट हाऊसफुल्ल चाललेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट निर्मितीतील सर्व बाबींचा त्याला अभ्यास करता आला. ‘आली आली गं भागाबाई’ हे यातील गाणं चांगलंच लोकप्रिय झालेलं आहे.

मराठी चित्रपटाचे विषय चांगले असतात; परंतु काहीवेळा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो मिळाले पाहिजेत. जास्तीत जास्त स्क्रीन मिळाले पाहिजेत, असा आशावाद त्याने व्यक्त केला. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटाच्या गर्दीत मराठी चित्रपट हरवत चाललेला आहे असे प्रसादला वाटते. जर प्रेक्षकांनी ठरवले की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायचे, तर त्या थिएटर मालकाला मराठी चित्रपट तेथे लावावाच लागेल. मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस येतील. प्रसाद नेहमी सकारात्मक दृष्टीने विचार करतो. प्रत्येकाने तसा विचार करावा, असे त्याला वाटते. आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक संधीच सोनं करता आले पाहिजे. प्रसादला मिळालेल्या दिग्दर्शनाच्या संधीच त्याने सोन्यात रूपांतर केलं आहे, यात मात्र तीळमात्र शंका नाही.

Comments
Add Comment