Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Corruption case : पेण मधील सर्वात श्रीमंत डोलवी ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार

Corruption case : पेण मधील सर्वात श्रीमंत डोलवी ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार

आजी-माजी सरपंच व ग्रामसेवकांविरोधात गुन्हा दाखल; संजय जांभळे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा

पेण : पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रुप ग्राम पंचायत डोलवी मध्ये आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा जाहीर आरोप ग्राम पंचायतीच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी जिप सभापती संजय जांभळे यांनी केला आहे. संजय जांभळे यांनी सदर भ्रष्टाचार उघडकीस आणला असून, माजी सरपंच वनिता अनिल म्हात्रे, विद्यमान सरपंच परशुराम तुकाराम म्हात्रे आणि ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांच्या विरुध्द वडखळ पोलीस स्टेशन मध्ये कलम ४२०, ४०९, ४०६ प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी सांगितले की, डोलवी ग्रामपंचायत मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी पेण गट विकास अधिकारी यांना काही महिन्यांपूर्वी याबाबत गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. किरण पाटील यांच्या बदली नंतर विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनीही पुन्हा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पेणचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ हे त्यांच्या दबावाखाली येत त्यांनी त्यांचेही आदेश न मानल्याने शेवटी मलाच हायकोर्टात जाऊन दाद मागावी लागली. हायकोर्टाने दस्तऐवज बघितल्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढले. कोर्टाने तर पेण गटविकास अधिकारी यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिले. १ डिसेंबर २०२३ रोजी उच्च न्यायालयाकडून शासनाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढूण तातडीने कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार रात्री उशिरा गटविकास अधिकारी भाउसाहेब पोळ यांनी वडखळ पोलीस ठाणे गाठत तत्कालीन सरपंच वनिता अनिल म्हात्रे, विद्यमान सरपंच परशुराम तुकाराम म्हात्रे आणि ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पेण गटविकास अधिकारी यांनी रात्री उशिरा भा.द.वी.कलम ४२०, ४०९, ४०६ आणि ३४ नुसार वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

या पत्रकार परिषदवेळी संजय जांभळे यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, रमाकांत पाटील, रामचंद्र देवजी म्हात्रे, अमृत म्हात्रे, भरत पाटील, अभय पाटील, लक्ष्मण पाटील, जे.बी.पाटील, गणेश बैकर, महेश माळी, कृष्णा कार्लेकर, संदीप पाटील, राजू पाटील, कृष्णा पाटील, नारायण जांभळे, दिनेश माळी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment