
नाशिकमध्ये आज सकाळपासुन ढगाळ वातावरण होते आणि दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. राज्यात आज नाशिकसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याअगोदरच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील निफाड सिन्नर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. अवकाळी पावसामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऐन हिवाळ्यात नाशिक जिल्ह्यात सह राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा पावसाचं काही ठिकाणी आगमान झालं आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक भागात पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे नागरिकांना ऐन हिवाळ्यात छत्री आणि रेनकोट आता बाहेर काढले आहेत तर पावसामुळे गारवा देखील दुपटीने वाढला आहे. हवामान विभागाने २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता.
अचानक झालेल्या या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने बऱ्याचश्या द्राक्षे बागांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कांद्यांच्या शेतीवर देखील बराच परिणाम झाला आहे. आणखी दोन दिवसांसाठी पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.