Saturday, May 10, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

Payal Jadhav : आता फक्त अभिनय करायचाय...

Payal Jadhav : आता फक्त अभिनय करायचाय...
  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

'बाप ल्योक’ चित्रपटातील बाप व मुलाच्या संगतीने या चित्रपटातील सूनदेखील प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहून गेली. तिची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे पायल जाधव. पायलचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचा. ती शाळेत असताना तिचे पुण्यात स्थलांतर झाले. तिने बी.एस्सी. (बॉटनी) केलं. त्यानंतर तिने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून भरतनाट्यातून एम. ए. केले. एम.ए.च्या शेवटच्या वर्षाला असताना तिला कास्टिंग डायरेक्टर योगेश निकमचा फोन आला. तिला एका मराठी चित्रपटासाठी ऑडिशन द्यावी लागली. ऑडिशनमध्ये पास झाल्यानंतर तिची त्या चित्रपटासाठी निवड झाली. चित्रपट होता मकरंद माने दिग्दर्शित, नागराज मंजुळे प्रस्तुत ‘बाप ल्योक’ चित्रपट. हा तिच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटात मयूरी ही व्यक्तिरेखा तिने साकारली होती. मयूरी ही स्वभावाने मनमिळावू आहे. ती स्वाभिमानी आहे. शेतकरी मुलाशी लग्न करायचं हे तिचं आधीच ठरलेलं आहे. ज्याप्रमाणे दुधात साखर मिसळल्यानंतर गोडवा निर्माण होतो; परंतु साखर वेगळी नसते. त्याप्रमाणे सून ही वेगळी नसते, ती कुटुंबात रमल्यानंतर गोडवा निर्माण करते.

भरतनाट्यम करताना ती अभिनय करायची; परंतु चित्रपटात अभिनय करताना कॅमेराचे भान ठेवावं लागतं, ही शिकवण तिला मिळाली. शूटिंगच्या दरम्यानचा एक किस्सा तिने सांगितला. ती म्हणाली की, “दिग्दर्शकाने मला सांगितले होते की, जोपर्यंत कट बोलत नाही, तोपर्यंत अभिनय करत राहायचं. एका सीनमध्ये मी पाठमोरी उभी असते व फोनवर बोलत उभी होते. खूप वेळ झाला तरी मी फोनवर बोलतच उभी होते. नंतर जेव्हा मी सरळ उभी राहून पाहू लागले, तेव्हा मला आढळून आले की, सर्वजण तिथून निघून गेले होते.”

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडेसोबत भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. या चित्रपटातील नायक विठ्ठल काळेसोबत अगोदर तिने एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. त्यामुळे या चित्रपटात त्याच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी तिला या चित्रपटातील मयूरी व्यक्तिरेखेचा अभ्यास करायला सांगितला. तिचे मत मांडायला सांगितले. त्यानंतर त्यांनी तिला योग्य ते मार्गदर्शन केले. या चित्रपटातील लेकाची भूमिका करणाऱ्या विठ्ठल काळे सोबत प्रथम गाण्याचा मोंटाज शूट करण्यात आला. रात्रीच्या वेळी विहिरीच्या कडेवर दोघे बसलेले होते व त्यांच्यावर गाणे चित्रित करण्यात आले.

गेल्या वर्षी झालेल्या वारीमध्ये तिने संत कान्होपात्राची भूमिका केली होती. एका काकींनी तेथे येऊन तिला पाचशे रुपयांची नोट बक्षीस दिली व म्हणाली, “तू अभिनेत्री स्मिता पाटील सारखी दिसतेस.” ही प्रतिक्रिया तिला खूप भावली. यापुढे फक्त अभिनय करण्याचा दृढनिश्चय तिने केला आहे. तिला अभिनेता धनुष, दिग्दर्शक नागराज मंजुळे, महेश मांजरेकर सोबत काम करायचे आहे.

Comments
Add Comment