Saturday, May 10, 2025

कोलाजसाप्ताहिक

Jhimma 2 : ‘झिम्मा २’चा धमाकेदार टीझर...

Jhimma 2 : ‘झिम्मा २’चा धमाकेदार टीझर...
  • ऐकलंत का! : दीपक परब

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर अनोखा असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. यामधील दमदार गँग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझरमधून मजेदारपणे झळकत आहेत. या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ‘यावेळेला खूपच व्हरायटी आहे’ आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. मागच्या वेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली आणि आता ‘झिम्मा २’ मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरू शकते. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत. या टीझरमध्ये त्यांची पात्रेदेखील भन्नाट वाटत आहेत.

‘झिम्मा’मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध यानिमित्ताने घेता आला. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव ‘झिम्मा’ने करून दिली. हेच ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा सिनेमा आहे.बऱ्याच काळानंतर एकत्र आल्यानंतर आता या सगळ्यांचे ‘रियुनियन’ किती हॅपनिंग असणार, हे अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती, २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘झिम्मा २’ च्या प्रदर्शनाची.यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘झिम्मा' पाहून अनेक महिलांनी, ज्या कधीही कुटुंबाशिवाय बाहेर फिरकल्या नाहीत, त्यांनी स्वतः मैत्रिणींसोबत सहली आयोजित केल्या. प्रेक्षकांनी मेसेजद्वारे ‘झिम्मा २’ यावा, अशी मागणीही केली.

Comments
Add Comment