
हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक आलं समोर
मुंबई : महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं (Winter session) वेळापत्रक समोर आलं आहे. नागपुरात ७ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन होणार आहे. या दरम्यानच्या दहा दिवसांच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते, यावर्षी ते बुधवारीच संपणार आहे. त्यामुळे अधिवेशनातून दोन दिवस कट होणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. परंतु यंदाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या १० दिवसांत गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान दहा दिवस कामकाज होणार असून त्या पुढे कामकाज चालणार आहे की अधिवेशन २० डिसेंबरला गुंडाळलं जाणार आहे, हे विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु झाली आहे. नाशिक-पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, नागपूरमध्ये अतिवृष्टीने झालेलं नुकसान याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुराच्या तडाख्याने नागरिकांचे मोठे नुकसान झालेल्या, पायाभूत सोयी सुविधांचे नुकसान झालेल्या नागपूर शहर आणि जिल्ह्याला हिवाळी अधिवेशनाच्या काळात विशेष पॅकेज मिळेल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं होतं.