
लवकरच जमा होणार पहिला हप्ता
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने (Mahayuti Government) घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (NAMO Shetkari Yojana) पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या अर्थसंकल्प मांडताना ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan Samman Nidhi) या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य मंत्रिमंडळाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळणार आहेत. एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीसाठी पहिला हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत.
काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेप्रमाणेच आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करते. त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी केंद्र सरकारचे सहा व राज्य सरकारचे सहा असे मिळून बारा हजार रुपये जमा होणार आहेत.