
करिअर: सुरेश वांदिले
आई-वडिलांच्या इच्छेला बळी पडून मुले दहावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या चाळणी किंवा प्रवेश परीक्षेच्या कोचिंग क्लासेसच्या दावणीला बांधले जातात. त्यांची पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत सारखी पळापळ सुरू राहते. बहुतेक कोचिंग क्लासेसमध्ये यांत्रिकी पद्धतीने म्हणजेच अधिकाधिक गुण कसे मिळवता येईल किंवा परीक्षा कशी क्रॅक करता येईल? याच पद्धतीवर भर दिला जातो. यामध्ये मूलभूत संकल्पना समजून देण्याच्या किंवा त्या समजून घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याकडे बहुतेकदा दुर्लक्ष केलं जातं. शनिवारी/ रविवारी होणाऱ्या टेस्ट आणि त्यात मिळणारे गुण, त्याचं विश्लेषण याचं सध्या मोठच कोडकौतुक घरीदारी होत असतं. अशा टेस्टमध्ये मिळणारे गुण म्हणजे त्याचा चांगल्या महाविद्यालयातला प्रवेश जवळपास निश्चितच झाल्याचा, भ्रमाचा अंगरखा पांघरला जातो. या अंगरख्याची रंगरंगोटी करून पालकांना आणि पाल्याला वास्तवाची फारशी जाणीव होणार नाही याची क्लासचालक खुबीदाररीत्या काळजी घेतात. प्रत्यक्ष निकाल लागतो तेव्हा इतके विपरित घडलं असतं की, त्या धक्क्यातून पालक आणि पाल्यास बाहेर पडण्यास बराच कालावधी जातो. हा धक्का मनात साठवूनच विद्यार्थ्याचा पुढचा प्रवास सुरू होतो खरा, पण यातून फार कमी विद्यार्थी सावरतात नि प्रगती करतात. इतरांची भटकंती सुरू होते.
परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्याच्या एककलमी रेट्यामुळे विद्यार्थ्याला या काळात भाषा कौशल्य, संवाद कौशल्य, गणितीय कौशल्य, सादरीकरण कौशल्य अशा बाबींना साध्य करता येत नाही. याकडे पूर्णत: दुर्लक्ष होतं. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून शंभरातील २५ ते ३० टक्केच मुलं सक्षमरीत्या अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. त्यांना करिअरच्या संधी चांगल्या मिळतात. पण त्याच वर्गातील इतर मुलांना मात्र संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष इथे संपत नाही, कारण पुढे विविध स्पर्धापरीक्षेच्या आखाड्यात उतरल्यावर या बाबींच्या अभावामुळे या परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता येत नाही. अशा परीक्षा देण्यात उमेदीची चार-पाच वर्षे निघून जातात. यश काही मिळत नाही. दुय्यम किंवा तिय्यम श्रेणीच्या नोकरी किंवा रोजगाराकडे वळावं लागतं.
या प्रवासात झालेल्या कुतरओढीमुळे या मुलांच्या मनात स्वत:विषयी, पालकांविषयी, सामाजिक परिस्थितीविषयी कटुता येण्याचीही शक्यता असते. ही कटुता घेऊन ही मुलं जे काही पदरी पडलय, ते सुद्धा नीट वा योग्य पद्धतीनं करत नाहीत. त्यामुळे आणखी एक धक्का बसण्याची शक्यता असते. अशी ही चौफेर विचित्र स्थिती निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी पालकांनी समक्य विचार करूनच करिअरची दिशा ठरवायला हवी. दहावी- बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनाही आपल्या सक्षम बाजू किंवा कमकुवत बाजू निश्चितच लक्षात येतातच. त्या लक्षात घेऊन त्यांनीही काही आराखडे मनात ठरवले असतात. त्याविषयी त्याच्यासोबत पालकांनी चर्चा करायला हवी. समुपदेशक (काऊंसलिंग करणारे मार्गदर्शक) दिशा दाखवू शकत असले तरी त्याची पूर्वतयारी ही पालक आणि विद्यार्थ्यांनी घरी प्रामाणिकपणे करायला हवी. पाच-पंचवीस प्रश्न विचारून आणि त्याच्या गणितीय विश्लेषणानंतर काही निष्कर्ष जर समुपदेशक सांगत असेल, तर त्याचा निश्चितच विचार करायला हवा. पण हे निष्कर्ष म्हणजे ब्रह्मास्त्र नव्हे हेही तितकेच खरे.
आपल्या मुलाचं खरं पाणी पालकांना जितकं ठाऊक असतं, ते त्रयस्थाला ठाऊक होऊ शकतं, असं समजणं घातक ठरतं. प्रामाणिक विचारमंथनातूनच मुलांच्या मनात काय चाललेय? ही माहिती काढता येऊ शकते. मानसशास्त्रीयदृष्ट्या आपल्या निर्णयांना कुणाचा तरी पाठिंबा हवा असण्याची गरज असते. त्या गरेजेचं वर्तुळ आपण आपल्या सोयीनुसार काढू इच्छितो. ते टाळायला हवं. मुलाची इच्छा डॉक्टर वा इंजिनीअर बनण्याची नसेलच, तर त्यासाठी इतरांच्या मान्यता वा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न हा अंतिमत: केविलवाणा ठरू शकतो. त्यामुळे त्या वाटेने जाऊ नये. गणितात हुषार असूनही एखाद्या मुलाची अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची इच्छा असेल, तर त्याला नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशी मुलं पुढे मोठा पल्ला गाठतात. अशांना एकतर अपयश येत नाही. समजा आले तर ते स्वत:च त्यातून मार्गही काढतात. किंबहुना चांगल्या पर्यांयांचा शोध ते स्वत:च घेऊन ठेवतात. स्वत:च्या निर्णयाची जबाबदारी घेण्याचा प्रामाणिकपणा अशांकडे असतो.