
- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
परवा सहज विचार आला ‘अरे, आपल्याला कुणीतरी हाताने लिहिलेले शेवटचे पत्र कधी आले होते?’ विचार करून मी चक्रावून गेलो. कितीतरी वर्षात, मला एकही हाताने लिहिलेले पत्र आलेलेच नव्हते! पण मग, मी तरी इतक्या वर्षात कुठे कुणाला एक तरी पत्र पाठविले होते?
खरे तर आज पत्रे येतच नाहीत. कुरियरने येतात ती असतात कागदपत्रे! तंत्रज्ञानाने सगळे जग, त्याचे व्यवहार, रितीरिवाज, इतकेच काय माणसाची मानसिकतासुद्धा किती बदलली आहे! ईमेलमुळे सगळा पत्रव्यवहार तत्काळ घडतो! पण त्या संवादाला पत्र काही म्हणता येणार नाही.
पूर्वी गावात पोस्टाची लालभडक रंगाची पत्रपेटी असायची. आपले पत्र त्या पेटीत टाकल्यावर ते आपोआप दुसऱ्या गावातील आपल्या जवळच्यांना पोहोचते एवढीच जादू माहीत होती. मोठ्या शहरात अशा अनेक पेट्या लावलेल्या असत. त्याकाळी ‘लोककल्याणकारी सरकार’ ही कल्पना असल्याने सर्व बाबतीत लोकांचा विचार होई. गरीब माणूस फक्त १५ पैशांच्या कार्डात आपली खुशाली देशात कुठेही कळवू शकायचा! जास्त मजकूर असेल तर २० पैशाचे आंतरदेशीय पत्र पाठवायचे आणि कागदपत्र पाठवायचे असेल तर फक्त २५ पैशांत छानसा लिफाफा मिळे. तो बंद करताना चिकटवण्यासाठी पोस्टात डिंकाची बाटलीही ठेवलेली असायची! हल्लीसारखे किमान १०० रुपयांत तब्बल ५ दिवसांनी पोहोचणारे कुरियर नव्हते. त्या काळात पत्र तातडीचे असेल तर त्यावर फक्त ५ पैशांचे जास्तीचे तिकीट लावून “एक्स्प्रेस डिलिव्हरी” पत्र पाठवता येत असे. असे पत्र जास्तीच्या फक्त ५ पैशामुळे पोस्टाच्या नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळा टळल्यावरही पोहोचविले जायचे.
औरंगाबादला असताना मला ‘रेल्वे मेल सर्विस’ (आर.एम.एस.) हा माझ्या पिंडाला मिळता-जुळता मित्र सापडला होता. नोकरीसाठीचा प्रत्येक अर्ज शेवटच्या दिवशी आणि तोही पोस्टाची वेळ संपल्यावर टाकायचा ही माझी वाईट सवय बिचारे आर.एम.एस.वाले नेहमी पोटात घालायचे आणि माझे अर्ज वेळेत पोहोचत. मी सायंकाळी ८ वाजताही रजिस्टर पोस्ट पाठवले आहे. मला अशा वेळेनंतर टाकलेल्या अर्जावर यू.पी.एस.सी.च्या परीक्षेचे ‘हॉल तिकीट’ही आल्याचे आठवते.
एकेकाळी पत्राला सगळ्यांच्या भावविश्वात खास जागा होती! प्रत्येकाचे एखादे पत्र/चिठ्ठी अशी असायची की जी आजही लक्षात असते. कोवळ्या वयात एखादा चेहरा आवडून गेलेला असतो. एखादीचे गाणे, एखाद्याचे चित्र काढणे, बोलणे, हसणे असे काहीही आवडून गेलेले असते. जुन्या काळी त्या भावनेची कबुली थेट देता येत नसे. तेवढा धीटपणा मुलींमध्येच कशाला, मुलांमध्येही नसायचा. मग शाळेच्या वहीतील एखादे पान फाडून लिहिलेल्या चिठ्ठीतून त्या आवडलेल्या व्यक्तीच्या गुणांची ही कबुली दिली जायची! अर्थात अशा एकतर्फी संवादाने सुरू झालेली ‘कथा’ क्वचितच पुढे जायची. पण अनेक वर्षे ते वहीचे पान मात्र मोठ्या खजिन्यासारखे जपून ठेवले जायचे. क्वचितप्रसंगी त्या चोरट्या गुप्त चिट्ठीचे उत्तर यायचेही! पण ते हातात पडल्यानंतरही लगेच वाचता येत नसे. विश्वासू मित्राच्या/मैत्रिणीच्या घरी किंवा अगदी स्वच्छतागृहातही त्याचे पहिले वाचन होत असे.
हिंदी सिनेमात पत्रांना एक वेगळेच रोमँटिक महत्त्व होते. संगममधील ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज ना होना’सारख्या गाण्यापासून सरस्वतीचंद्र मधील ‘फुल तुम्हे भेजा हैं खतमे, फुल नही मेरा दिल हैं’सारख्या गाण्यापर्यंत असंख्य गाणी केवळ प्रेमपत्रांवर लिहिली गेलेली होती. त्यातले संजय दत्तच्या ‘नाम’मधील ‘चिठ्ठी आई हैं, वतनसे चिठ्ठी आई हैं’ या नरेंद्र चंचल यांच्या आवाजातील गाण्याने तर अनेकांना ढसढसा रडवले.
असेच एक सुंदर मराठी भावगीत आकाशवाणीवर लागायचे. तेही नेमके पोस्टमन यायच्या वेळी, म्हणजे दुपारीच! मराठीतील एक आगळाच गोड आवाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या कृष्ण कल्ले यांनी ते गायले होते! असंख्य मराठी तरुणींच्या गालावर लाली उमटवणारे, संगीतकार बाळ चावरे यांच्या संगीत दिग्दर्शनातले रमेश अणावकरांचे ते शब्द होते- ‘पत्र तुझे ते येता अवचित, लाली गाली खुलते नकळत।’
त्याकाळी प्रेमपत्र हा जरी प्रेमाचा संवाद सुरू करणारा महत्त्वाचा मार्ग होता तरी ही गोष्ट अतिशय गुप्त असायची. कारण मुला-मुलीत संवाद होणे आजसारखे मुळीच सोपे नव्हते. मुलांच्या आणि मुलींच्या शाळा वेगवेगळ्या असत. जिथे त्या एकच असायच्या. तिथेही मुलीना फक्त मैत्रिणी आणि मुलांना फक्त मित्रच असणे अपेक्षित असायचे. फार क्वचित दोघांत संवाद होई. मात्र यौवनसुलभ भावना तर सदासर्वकाळ सारख्याच असणार ना! मग हस्ते-परहस्ते असे लिखित प्रेमसंदेशांचे आदानप्रदान व्हायचे.
कधी असा संदेश लगेच झिडकारला जाई, तर कधी त्याची कोण अपूर्वाई असायची! म्हणून रमेश अणावकरांची प्रिया म्हणते- साधे सोपे पत्र सुनेरी, न कळे क्षणभर ठेवू कुठे मी? शब्दोशब्दी प्रीत हासरी, लाज मनाला, मी शरणांगत।
प्रेमाच्या नुसत्या कल्पनेने, उल्लेखानेही स्त्रीमनात लज्जा उत्पन्न होई, मुली लाजत, हरखून जात, फुलत. एकदा प्रेम मिळाले की त्यांचे मन प्रियकराला शरणागत होऊन जाई. भावी संसाराची, मिलनाची स्वप्ने दिसू लागत. कधीकधी उभयपक्षी प्रेमाची ओळख मनोमन पटलेली असायची. मात्र प्रेमाची अभिव्यक्ती अवघड होती. प्रेयसीला वाटे आपले मन ‘त्यानेच’ समजून घ्यावे. म्हणून ती म्हणते- आजवरी जे बोलू न शकले, शब्दावाचून तू ओळखिले. गीत लाजरे ओठावरले, गुणगुणते मी नयनी गिरवीत।
तशी प्रेम ही मनालाच काय अवघ्या भावविश्वाला घेरून टाकणारी भावना असते. प्रेमातुर मनाला काळ-वेळेचे भान राहत नाही. एकीकडे मनातले सगळे कुठेतरी व्यक्त करायची उत्कट इच्छा असते, तर दुसरीकडे आपले गुपित कुणालाच कळू नये असेही वाटत राहते - वेळी अवेळी झोपेमधुनी, जागी होते मी बावरूनी. खुळ्य़ा मनीचा भास जाणुनी, गूज मनीचे हृदयी लपवीत।’
आज पत्रे येत नाहीत, पाठवलीही जात नाहीत, एवढेच नाही. अनेक बाबतीत बदल मोठा झाला आहे. अनेक मानवी भावना जगण्यातूनच अदृश्य होत आहेत. औद्योगिक जगाने त्याच्या गरजेसाठी स्त्रीलाही पुरुषासारखे करून टाकले आहे. त्यामुळे लाजणे, झुरणे, हरखून जाणे, आनंदाने बहरून येणे ही क्रियापदेच नष्ट होतील की काय असे वाटू लागले आहे.
अशा वेगाने शुष्क होत चाललेल्या मन:स्थितीत नुसते जीवलगाचे पत्र आल्याने गालावर लाली येणे वगैरे तर कालबाह्य गोष्टच होणार. होय! ते आता स्वीकारले पाहिजे. तोवर ही अशी गोड गाणी ऐकणे तर आपल्या हातात आहे ना? म्हणूनच...