
मुंबई: नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने(mohammad siraj) जबरदस्त गोलंदाजीचा नमुना सादर केला. या वेगवान गोलंदाजाने रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला सातव्यांदा आशिया चषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आशिया चषकच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद सिराजने ७ षटकांत २१ धावा देत ६ खेळाडूंना बाद केले. या घातक गोलंदाजीनंतर श्रीलंकेचा संघ अवघ्या १५.२ षटकांत ५० धावांवर आटोपला.
सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो
सोशल मीडियावर मोहम्मद सिराजचा फोटो वेगाने व्हायरल झाला. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या इन्स्टाग्रामवर वडिलांच्या आठवणीत एक स्टोरी लावली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत मोहम्मद सिराजचे वडील आणि आई दिसत आहे. दोघांच्या हातात एक फोटो आहे. या फोटोत मोहम्मद सिराज भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसत आहे. सोबतच सिराजने कॅप्शनमध्ये मिस यू पापा असे दिसत आहे.
टीम इंडियाने सातव्यांदा जिंकला आशिया चषक
सोशल मीडियावर युजर्स मोहम्मद सिराजच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सातत्याने आपली प्रतिक्रिया देत आहेत. तर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याआधी आशिया चषकच्या फायनलमध्ये शानदार गोलंदाजीसाठी मोहम्मद सिराजला प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघासमोर आशिया चषक विजयासाठी ५१ धावांचे आव्हान होते. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने ६.१ षटकांत एकही विकेट न गमावता ५१ धावा करत खिताब आपल्या नावे केला. भारताचा चायनामन स्पिनर कुलदीप यादवला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट म्हणून निवडण्यात आले.