
- मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर
"गोपाळकाला म्हंजे काय हो टीचर...?” शाळेत एका विद्यार्थ्याने असा प्रश्न केल्यावर मला माझ्या बालपणी ऐकलेल्या कृष्ण जन्म व कृष्णाच्या बाललीलांच्या गोष्टी आठवू लागल्या. लहानगा खट्याळ कान्हा गाईगुरांना चरण्यासाठी रानात घेऊन जातो, तिथे आपल्या सवंगड्यांसोबत वेगवेगळे खेळ खेळतो, आपल्या बासरी वादनाने चराचराला मंत्रमुग्ध करतो. मग शेवटी सर्वजण एकत्र येऊन सहभोजन करतात. कुणाच्या शिदोरीत साधी भाजी भाकर, कोणाकडे पोहे, कोणाकडे दही तर कोणाकडे गोड धोड पक्वान्न. मग कृष्ण हे सारं एकत्र करून त्याचा मस्त काला करतो आणि सर्वजण तो आनंदाने खातात. मी हे सारं गोष्टीरूपात विद्यार्थ्यांना सांगत होते. एवढ्यात एक विद्यार्थी म्हणाला, “टिचर म्हणजे आम्ही मधल्या सुट्टीत आमचे टिफिन शेअरिंग करतो तसंच आहे ना हे?” मला हे ऐकून फार आनंद झाला. कारण गोपाळकाल्याचा अर्थ त्यांना नीट कळलेला होता. आम्ही विद्यार्थ्याना शेअरिंग इज केअरिंग हे शिकवत असतो, तेच श्रीकृष्णाने त्याच्या असंख्य जीवन लीलातून दाखवलेलं आहे. समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हे भेद व्यर्थ आहेत. सर्वांना जोडणारा माणुसकीचा व प्रेमाचा धागाच शेवटी खरा असतो आणि तोच जपण्याचा संदेश कृष्ण आपल्याला देतो.
प्रेम योगावर करावं प्रेम भोगावर करावं पण त्याहूनही अधिक प्रेम त्यागावर करावं... असा कृष्णाच्या जीवनातला अनोखा प्रेमयोग आहे.
नंद-यशोदेच्या राजमहालात तो राहात होता तरी त्याचे अनेक गरीब मित्रही होते. घरात सर्व सुबत्ता, भरपूर दूधदुभतं असतानाही दहीहंडीचा खटाटोप फक्त आपल्या मित्रांसाठी तो करत असे. गोकुळातल्या गवळणींनी दही, दूध, लोणी मथुरेच्या बाजारात जाऊन विकण्यापूर्वी घरातल्या मुलांना ते आधी द्यायला हवं असा त्याचा हट्ट होता. म्हणूनच तो दही, दूध, लोणी आपल्या सवंगड्यांसह गोकुळवासीयांच्या घरात गुपचूप शिरून चोरून खाई, गवळणींचे मटके फोडी. गोप-गवळणी लटक्या रागाने तक्रारी करत. पण हा कृष्णच शेवटी आपला तारणहार आहे, याचीही त्यांना पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच तर कृष्णाच्या सांगण्यानुसार त्यांनी संपूर्ण गोवर्धन पर्वत काठ्यांच्या आधारावर उचलला होता. यमुनेच्या डोहातील जहरी कालियाच्या जाचातून त्यानेच तर गोकुळाची सुटका केली होती. त्यामुळे ‘वृंदावन का कृष्ण कन्हैय्या सब की आँखो का तारा’ होताच. मात्र खुद्द त्यालाही जीवनातला संघर्ष चुकलेला नव्हता.
वसूदेव-देवकीच्या पोटी कारावासात जन्म. जन्मास आल्यावर लगेचच कंसाच्या धाकामुळे त्याला आई-वडिलांचा त्याग करावा लागला. गोकुळात यशोदेच्या लाडाकोडात मोठा झाल्यावर एक दिवस अचानक तिलाही सोडून त्याला मथुरेला जावं लागलं. गोकुळच्या अनेक आठवणींना व प्रिय राधेलादेखील तो अंतरला. पुढे तो द्वारकाधीश झाला. द्वारकाधीश होऊनही सुदाम्याची मैत्री तो विसरला नाही. महाभारतासारखा युद्धात दिव्य सुदर्शनचक्र असतानाही शस्त्र हाती न धरता अर्जुनाचा सारथी होणं त्याने स्वीकारलं. ऐन युद्धाच्या प्रसंगी हतबल झालेल्या अर्जुनाला समजावण्याचं कामही खुद्द कृष्णालाच करावं लागलं. मात्र याच कार्यामुळे कृष्ण जगद्गुरू ठरला. अर्जुनाला त्याने गीतेच्या रूपाने केलेला उपदेश म्हणजे समस्त मानवतेसाठी एक प्रेरक तत्त्वज्ञान आहे. गीतेतील प्रत्येक ओळ म्हणजे एक जीवन प्रणाली आहे. खरं तर कृष्ण म्हणजेच एक जीवन आहे. आयुष्यरूपी कोड्याचं उत्तर आहे. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचं पर्व आपण भक्तिभावाने आनंद व उत्साहात साजरं करतो.
कृष्णाष्टमीचा श्रावण महिनाही कृष्णासारखाच लोभसवाणा आहे. ऊन-पाऊस यांचा समन्वय साधणारा, सप्तरंगी इंद्रधनुष्य मिरवणारा, कधी रिमझिमत्या पावसात भिजवणारा, कधी कोवळ्या सोनेरी रविकिरणांनी कवेत घेणारा. श्रावणात शेतं फुलतात, नदी-नाले दुथडी भरून वाहतात. सर्वत्र अगदी प्रसन्न आणि पवित्र वातावरण बनलेलं असतं आणि त्यात येणारा दहीहंडी-गोपाळकाला अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण. एकीचं महत्त्व दाखवणारा, सर्वांना प्रेम देणारा, बालगोपाळांना आनंद देणारा. तो आपल्याला पुनःपुन्हा कृष्णाच्या आदर्शांची आठवण करून देतो. कोणताही भेद न करता सर्व सवंगड्यांसह गोड, तिखट, तुरट, आंबट सर्व चवी एकमेकांत मिसळून त्याने घेतलेली गोपाळकाल्याची मजा, उंच शिंक्यात टांगलेलं लोणी मिळवण्यासाठी गोपाळांनी रचलेला थर हे सारं म्हणूनच प्रतिकात्मक स्वरूपात आपण दहीहंडी आणि काल्याच्या रूपात साजरं करतो. कृष्ण जसा सर्वात मिसळला, सर्व रंगात मिसळून त्याचा एक श्रीरंग झाला तसाच सर्व समाज यानिमित्ताने एकरूप होऊन जातो. उत्सवाचा आणि कृष्णाचा रंगही जणू एक होऊन जातो, ‘अवघा रंग एक झाला’ अशी दिव्य अनुभूती आपल्यालाही तो देऊन जातो.