
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि चीनला ठणकावले आहे. ‘जी-२०’ बैठका काश्मीरमध्ये घेण्यास या देशांनी आक्षेप घेतले होते. वास्तविक काश्मीरचा प्रश्न हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे आणि त्यात तिसऱ्या राष्ट्राची लुडबूड चालणार नाही, हे शिमला करारातच एक कलम होते. इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात १९७२ मध्ये हा करार झाला होता. पण त्याला बाजूला सारून अनेक राष्ट्रांनी काश्मीर प्रश्नात लुडबूड करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आणि भारताने वारंवार त्यांना ठणकावले आहे. मोदी यांनी नव्याने तेच सांगितले आहे.
‘जी-२०’ बैठकांना आक्षेप घेण्याचा नसता उद्योग पाकिस्तान आणि चीनला करण्याचे काहीही कारण नाही. पण पाकिस्तानला काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्याची खाज स्वस्थ बसू देत नाही. अगदी युनोलाही या प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पण त्याबरोबरच मोदी यांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे. ती भारताच्या प्रगतीचा सार सांगणारी आहे. मोदी म्हणाले की, २०४७ मध्ये भारत विकसित देश बनेल. भारताने इंग्लंडला मागे टाकून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली, तेव्हाच हे स्पष्ट झाले होते. आता ते मोदी यांनी बोलून दाखवले इतकेच. भारताचे आर्थिक सामर्थ्य आज चीनपेक्षा कमी नाही. त्यामुळे मोदी यांच्या सुनावल्याचा त्या दोन देशांवर नक्कीच परिणाम झाला आहे. त्यामुळेच चिनी अध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात असूनही मोदी यांना भेटणार नाहीत. कारण मोदी यांच्यासमोर येण्याची त्यांची हिंमत नाही. मोदी यांनी याच वेळी बोलताना असेही सांगितले की, भारत २०४७ मध्ये विकसित राष्ट्र बनणार आहे. आज भारत इंग्लंडला मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. पण तो जेव्हा विकसित देश होईल, तेव्हा भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांना देशात काहीही स्थान नसेल, असेही मोदी यांनी सांगून टाकले आहे.
मोदी जेव्हा बोलतात, तेव्हा त्या हवेतील गप्पा नसतात. त्यामागे पुरावा आणि वस्तुस्थिती असते. इंदिरा गांधी यांच्या काळात भारताचा आर्थिक विकासाचा दर कधी साडेतीन टक्क्यांच्या वर गेला नाही. आज भारताचा विकास दर सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान आहे. हे मोदी यांचे यश आहे. भारतासारख्या विकसनशील आणि उद्याच्या विकसित देशाने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे. पाकिस्तान भारताबरोबरच स्वतंत्र झाला. पण तो देश आज कुठे आहे आणि भारत कुठे आहे, याचे आत्मपरीक्षण खरेतर पाकिस्तानने केले पाहिजे. उगीचच भारताविरोधात गरळ ओकून काड्या करण्याने पाक आणखीच पिछाडीवर जाणार आहे. भारताने मोठी झेप घेतली, तर अपप्रवृत्ती नष्ट होणार आहेत. त्यात भ्रष्टाचार, लाचलुचपत, घराणेशाही आदींचा समावेश आहे. मोदी यांनी पाक आणि चीनला सुनावले. त्यामुळे खरे तर त्या देशांनी सावध व्हायला हवे. कारण भारत आता काही जुना अविकसित देश उरलेला नाही. त्याने वैज्ञानिक प्रगती जशी केली आहे, तशीच आर्थिक प्रगतीही केली आहे. चीनची ताकद भारतापेक्षा थोडीशीच जास्त आहे.
कोरोनाच्या कालखंडातही भारत इतर देशांपेक्षा अधिक टिकून होता. त्यात मोदी यांच्या सर्वसमावेशक धोरणाचे सार आहे. भारताने चौफेर प्रगती केली आहे. डिजिटलायझेशन झाले आहे, रोकड व्यवहार जोरदार चालू आहेत. कॅशचे व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे दलालशाही आणि परमिट राज या कल्पना मनमोहन सिंग यांच्या काळात सर्वात महत्त्वाच्या होत्या. त्या आता पूर्ण बंद झाल्या आहेत. मोदी यांना विरोध करणारे जे कुणी आहेत ते याच दलालांचे पंटर आहेत, ज्यांची दुकानदारी बंद झाली आहे. काँग्रेसच्या काळात दलालांचे पेव फुटले होते. आता कोणत्याही योजनांच्या लाभार्थींच्या खात्यात थेट रक्कम जमा झाल्याने दलालांची मधल्यामध्ये लूट थांबली आहे. काँग्रेसचे सरकार शक्य असूनही या अपप्रवृत्तींना आळा घालू शकले नव्हते. कारण भ्रष्टाचार आणि भाई-भतीजा वाद यातच ते अडकले होते. अखेर त्या सरकारला लोकांनीच तिलांजली दिली. मोदी यांनी निर्धाराने या साऱ्या अपप्रवृत्तींना दूर केले. आज त्याची चांगली फळे लोक चाखत आहेत. कधी कधी ते काँग्रेसच्या बहकाव्यात येऊन मोदी यांना विरोध करतात. पण त्यांना नंतर पश्चाताप होतो. जसे तीन कृषी कायद्यांच्या बाबतीत झाले होते.
शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या जाचातून सोडवण्यासाठीच तर मोदी यांनी ते कायदे आणले होते. पण शेतकऱ्यांनाच ते नको होते, म्हणजे ‘कसायाला गाय धार्जिणी’ या म्हणीसारखेच हे होते. आज शेतकरी कुठेही आपला माल विकू शकतात. त्यांना सारे स्वातंत्र्य दिले आहे. तसे ते पूर्वीच्या काळात नव्हते. मोदी यांनी इतक्या काही गोष्टी केल्या आहेत की, त्यामुळेच भारत विकसित राष्ट्र बनेल, हे मोदी यांचे म्हणणे साधारण खरे वाटते. एकही क्षेत्र असे नाही, जिथे मोदी यांनी आघाडी घेतलेली नाही. भ्रष्टाचार तर मिटलाच आहे. अगदी किरकोळ स्तरावर शासकीय कारभारात त्याच्या पाऊलखुणा दिसतात. पण सार्वजनिक भ्रष्टाचार हा आता इतिहास झाला आहे. मोदी यांचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे की भारत एकदा विकसित राष्ट्र झाले की भ्रष्टाचार, घराणेशाही या अपप्रवृत्तींना त्यात काहीही स्थान नसेल. सारा भारत त्या दिवसाची वाट पाहत आहे.