Saturday, May 10, 2025

संपादकीयरविवार मंथन

‘सुवासिनी’

‘सुवासिनी’

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

मराठी चित्रपटविश्वातील एक गुणी, आपल्या साधेपणातील नितळ सौंदर्याने चित्रपट रसिकांना जिंकून घेणारी अभिनेत्री ‘सीमा’च्या आठवणी मनात रुंजी घालत आहेत.गिरगावातल्या एका चाळीत, सामान्य कुटुंबात या मुलीचा जन्म झाला. वडिलांचे छत्र हरपलेले. आई, आजी, मावशी, दोन बहिणी, एक भाऊ असे ७ जणांचे कुटुंब चाळीतल्या एका साध्या खोलीत राहात होते.आपल्या चुणचुणीत मुलीला आईने चांगल्या शाळेत घातले. एकच चांगला सीफ्रॉक तोच तोच घालावा लागत होता. फी नसल्यामुळे शाळकरी वयात ही मुलगी नृत्य शिकली. घरातील आर्थिक परिस्थितीवर तिच्या घरातील स्त्रियांनी आपापल्या परीने उपाय शोधले. त्या कोरसमध्ये गाऊ लागल्या.

सीमाचे मूळ नाव नलिनी. नलिनी सराफ तेव्हा जेमतेम नववीत होती. अंमलदार या नाटकातून तिचा नाट्यप्रवेश झाला. फिल्मिस्तानच्या फिल्मी दुनियेत तिने प्रवेश केला. तो आर्थिक परिस्थितीच्या कारणाने! एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे की, ‘शिकायचे, नोकरी करायची, घराला हातभार लावायचा आणि मनाप्रमाणे एखादा मुलगा आवडला की, त्याच्याशी लग्न करून सुखी संसार करायचा असी साधीसुधी अपेक्षा असलेली मी अभिनेत्री झाले.’ या प्रवासात अनेक खाचखळगे आले. पण त्यातून त्यांचे पाऊल पुढेच पडत गेले. त्यांच्या चित्रपटांतील सोज्ज्वळ भूमिकांबद्दल खूप काही बोलले गेले. पण सीमा यांचा नाट्यप्रवासही उल्लेखनीय आहे. अंमलदार, गहिरे रंग, कर्ता करविता यासारखी विविध नाटके, त्याकरिता गावोगावी प्रवास हे सर्व त्यांनी प्रामाणिकपणे केले.

प्रेमिका, पत्नी, आई, सासू या सर्व भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे निभावल्या. सासर-माहेरच्या सर्व परंपरा, रुढी, रितीरिवाज यांचा त्यांनी मनापासून सन्मान राखला. आई, बहीण, माहेर याची काळजी घेत... जपत जिथे जिथे आधार देता येईल, तिथे ती जबाबदारी घेतली. त्या त्या भूमिकेसाठी तयारी करताना सीमाताईंनी मनापासून परिश्रम घेतले. सानेगुरुजींवरील चित्रपट निर्मितीकरिता अक्षरश: रमेश देवांसोबत उभ्या राहिल्या. शूटिंगकरिता बाहेर असल्यावर शक्य होईल, तिथून मुलांकरिता धावत येणारी सीमा ही अभिनेत्री म्हणजे ‘घार हिंडते, आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी!’ सीमा देव यांचे ‘सुवासिनी’ हे आत्मथन मराठी रसिकांनी आवर्जून वाचले पाहिजे. स्त्रीने संसाराची जबाबदारी निभावणे आणि तिने रंगकर्मी म्हणून जगणे सोपे नसते. मराठी कलाजगतातील अशा एका सुवासिनीला आदरांजली...

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment