
- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत यांचा जन्म मुंबईचा. आई अभिनेत्री, तर वडील दिग्दर्शक व संकलक, त्यामुळे साहजिकच त्यांची पावले या मायावी चित्रपटसृष्टीकडे वळली.
‘लाखों है यहाँ दिलवाले’ हा पहिला हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. त्यामध्ये वी. जे. भाटिया, कृतिका गायकवाड, आदित्य पांचोली, किशोरी शहाणे-विज, अरुण बक्षी हे कलाकार होते. हा चित्रपट रस्त्यावर गाणाऱ्या गायकाच्या अनुभवावर आधारित होता. एखाद्या गायकाचे भविष्य कसे असेल हे या चित्रपटात दाखविले होते. या चित्रपटात नायिका नायकाला सांगते की, तिचे वडील गायक होते. त्यानंतर तिच्या वडिलांचा फ्लॅशबॅक दाखवायचा होता, त्यामुळे तिच्या वडिलांच्या सीनचे शूटिंग करायचे होते; परंतु वडिलांची भूमिका करणारा कलाकार काही त्यावेळी आला नाही, त्यामुळे त्याची भूमिका मुन्नावरजींनी केली. त्या पहिल्या चित्रपटात अभिनय व दिग्दर्शन या दोन्ही भूमिका त्यांना लीलया पार पाडाव्या लागल्या.
त्यानंतर ‘निवडुंग’ हा मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटात भूषण प्रधान, शेखर फडके, सारा श्रवण, प्राजक्ता दिघे, आस्ताद काळे हे कलाकार होते. या चित्रपटाचे कथानक चांगले होते. एक तरुण दुष्काळग्रस्त गावामध्ये जीव द्यायचा या उद्देशाने येतो, तेथे त्याची एका तरुणीशी भेट होते. ती तरुणी त्या तरुणाला जीवाचे महत्त्व पटवून देते. त्यानंतर तो जीव देण्यापासून परावृत्त होतो.
त्यानंतर एक अर्धवट बंद पडलेला चित्रपट त्यांच्याकडे आला. कलाकार व दिग्दर्शक यांच्या वादातून हा चित्रपट बंद पडला होता. त्यानंतर त्यांनी या चित्रपटात काही बदल केले. संवाद लिहिताना चित्रपट कथेचे महत्त्व पटते. हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. त्या चित्रपटाचे नाव आहे. ‘गेला उडत.’ हा त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाला रफीक शेख यांनी संगीत दिलं असून पार्श्वगायन सलिल अमृते यांचं आहे. मकरंद पाध्ये, ज्योत्स्ना राजे गायकवाड, प्रसाद माळी, शालवी शाह, किसन खंदारे यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. एका मध्यमवर्गीय व्यक्तीभोवती या चित्रपटाचे कथानक गुंफलेले आहे. गरिबीचे चटके, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या, आपल्याच कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या, त्या पूर्ण करण्यात सातत्याने येणार अपयश, यामुळे चित्रपटातल्या मुख्य पात्राचे आयुष्य ग्रस्त असतं. भगवान हनुमानावर त्याची प्रचंड श्रद्धा असते. या श्रद्धेतून एक दिवस तो अचानक म्हणतो मी उडू शकतो! आधी त्याच्यावर विश्वास न ठेवणारी माणसं हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात खरे. पण त्याला उडताना मात्र कुणीच पाहिलेलं नाही. शेवटी एकतर आम्हाला हवेत उडून दाखव, नाहीतर परिणामांना तयार राहा, असा इशाराच जेव्हा त्याला आसपासची मंडळी देतात, तेव्हा मात्र कसोटीचा क्षण उभा ठाकतो. तो खरंच उडू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटात पाहायला मिळेल.
अंधश्रद्धा बऱ्याचदा नुकसान करणाऱ्या जरी असल्या तरी अनेकदा त्यामुळे काही आयुष्य पूर्णपणे बदलून जातात. अशाच एका बदललेल्या आयुष्याची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मनोरंजनसृष्टीतील बरा-वाईट अनुभव गाठीशी घेऊन मोठ्या उमेदाने त्यांचा दिग्दर्शनीय प्रवास सुरू आहे.