
- प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
काही वर्षांपूर्वी ज्यांची नावेसुद्धा माहीत नव्हती असे सोशल मीडियाच्या वापरामुळे माहीत झालेले, अनेक उत्सव अलीकडे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. वाढत जाणाऱ्या या उत्सवांमध्ये, तरुणांच्या कलागुणांना खूप मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. ते चांगले कलाकार, साहित्यिक वा वक्ते म्हणून घडत आहेत.
आमच्या लहानपणी सणाची आणि उत्सवांची आम्ही वाट पाहत राहायचो. दिवाळी, दसरा, होळी, गुढीपाडवा असे काही सण परिवारासोबत, शेजाऱ्यापाजाऱ्यांसोबत धुमधडाक्यात साजरे केल्याच्या आठवणी आजही मनपटलावर ताज्या आहेत. मामा-मामी, काका-काकू, मावशी-काका, मावस-आते-चुलत-बहीणभावंड यानिमित्ताने घरी यायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी जायचो. पूजापाठ, आरत्या-भजनं असोत, नैवेद्य दाखवल्यावर उठणाऱ्या पुरणावरणाच्या, श्रीखंड-बासुंदीच्या जेवणाच्या पंगती असोत, हास्य विनोद गप्पांच्या मैफली असोत... खूप मजा यायची. काळपरत्वे सुखसुविधा वाढल्या, तंत्रज्ञानात भन्नाट प्रगती झाली हे सगळे चांगले झाले; परंतु माणसे माणसांपासून दुरावली. यामागच्या कारणांचा शोध घेताना, सर्वात महत्त्वाचे कारण मला दिसते की, कुटुंबे छोटी होत चालली आहेत आणि त्या छोट्या कुटुंबांना एखादे कौटुंबिक संमेलन घडवून आणणे कठीण होत चालले आहे. लग्नसमारंभ, डोहाळे जेवण वा वाढदिवसाच्या निमित्ताने तशा एका मांडवाखाली, एखाद्या हॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये भेटी होतात; परंतु त्या फक्त काही तासांपुरताच मर्यादित असतात. आज-काल मोठा काळ एकमेकांसोबत घालवणे, सगळ्यांनाच आपल्या व्यस्ततेमुळे कठीण होत चालले आहे.
एकीकडे हे सत्य असले तरी दुसरीकडे मात्र अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यांना आता ‘इव्हेंट्स’ म्हटले जाते. ‘दिवाळी पहाटचा इव्हेंट’, ‘गुढीपाडवा सेलिब्रेशनचा इव्हेंट’, ‘नवरात्री सेलिब्रेशन इव्हेंट’, ‘गणपती फेस्टिव्हल सेलिब्रेशन इव्हेंट’, ‘दहीहंडी फेस्टिव्हल इव्हेंट’ इत्यादी. पण काही असो त्यानिमित्ताने माणसे एकमेकांना भेटतात, पारंपरिक कपडे घालून सर्व मिरवतात, सोबतीने खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. आपापल्या कुवतीप्रमाणे या उत्सवात उत्साहामध्ये भाग घेतात. या निमित्ताने काही संस्था काही सामाजिक उपक्रम राबवतात जसे की, ‘रक्तदान शिबीर’, ‘आरोग्य शिबीर’, ‘अवयव दान आणि देहदान याविषयीची जागृती मोहीम’ इत्यादी. वेगवेगळ्या वयोगटातील प्रत्येकासाठी कोणतेतरी कार्यक्रम, स्पर्धा वगैरे. पूर्वी यातील काही सण उत्सव हे फक्त एखाद्या कुटुंबापुरताच मर्यादित होते ते मोठ्या प्रमाणात सार्वजनिक झालेत.
काही वर्षांपूर्वी ज्यांची नावेसुद्धा माहीत नव्हती असे सोशल मीडियाच्या वापरामुळे माहीत झालेले, अनेक उत्सव अलीकडे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. उदा. जागतिक किडनी दिवस, जागतिक हास्यदिन, आंतरराष्ट्रीय मातृदिन, जागतिक पितृदिन, जागतिक कुटुंबदिन, जागतिक पालकदिन, जागतिक कामगारदिन, जागतिक योगदिन, जागतिक तत्त्वज्ञानदिन, जागतिक युवादिन, जागतिक औद्योगिक सुरक्षादिन, जागतिक महिला दिन इत्यादी. ही यादी खरोखरी मोठी आहे आणि तरीही महत्त्वाची आहे. यानिमित्ताने छोट्या वस्त्यांमध्ये, काॅर्पोरेट ऑफिसेसमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये हे सर्व दिवस साजरे केले जातात. त्यानिमित्ताने कुटुंबाचे महत्त्व, पर्यावरणाचे महत्त्व, हास्याचे व योगाचे महत्त्व त्याचप्रमाणे हृदय-किडनीसहित वेगवेगळ्या अवयवांची काळजी, वेगवेगळ्या हत्यारांची व विजेच्या साधनांची काळजी घ्यायची आणि सुरक्षितता याविषयी तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवले जातात, जे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचे आहे.
या वाढत जाणाऱ्या उत्सवांमध्ये, तरुणांच्या कलागुणांना खूप मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. ते चांगले कलाकार, साहित्यिक वा वक्ते म्हणून घडत आहेत. आपल्या वयाच्या, विचारांच्या सहकाऱ्यांना जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये मानसन्मान मिळतो तेव्हा इतरही त्याच्यातून प्रोत्साहन घेऊन, वेगळ्या क्षेत्राकडे वळतात. चांगल्या विचारांचा, ज्ञानाचा प्रसार आणि प्रसार या सण आणि उत्सवांमुळे निश्चितपणे होतो. वाढत जाणारे सण आणि उत्सव ही आजच्या काळाची गरज आहे, असे मला तरी मनापासून वाटते!
pratibha.saraph@gmail.com