
- ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांतील नात्यातील प्रेम उत्कट आहे! तीच जवळीक, उत्कटता ज्ञानदेव आपल्या ओव्यांत ओततात. ज्ञानदेवांच्या ठिकाणी या नादाचं, लयीचं विलक्षण भान आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीत याचा अनुभव पुन्हा पुन्हा येतो. श्रीकृष्ण-अर्जुन या दोघांतील भक्तिभावाचं वर्णन करताना आपल्या दाखल्यांद्वारे ज्ञानोबा वाचक, श्रोत्यांचं उन्नयन करतात, त्यांची पातळी उंचावतात.
ज्ञानेश्वरीतील अठरावा अध्याय म्हणजे कळसाध्याय. यात भगवान श्रीकृष्ण लाडक्या अर्जुनाला पुन्हा एकवार आत्मज्ञान देण्यास तत्पर आहेत. त्यावेळच्या प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या ज्ञानदेवांच्या ओव्या म्हणजे काव्याचा कळस होय! श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील अतूट प्रेम, जिव्हाळा, शब्देवीण संवाद इतक्या उत्कटतेने ज्ञानदेव रेखाटतात! त्यातील रत्नासारख्या काही ओव्या पाहूया.
श्रीकृष्ण म्हणतात, ‘तर आणखी एक वेळ अवधान चांगले विस्तीर्ण करून माझे निर्मळ वचन ऐक. तरी अवधान पंघळ। करुनियां आणी एक वेळ। वाक्य माझे निर्मळ। अवधारीं पां॥ ओवी क्र. १३४१
‘पंघळ’ म्हणजे विस्तीर्ण करून, ‘अवधारी’चा अर्थ आहे ‘ऐक’. पंघळ, एक वेळ आणि निर्मळ। ‘ळ’ या अक्षराच्या पुन्हा पुन्हा येण्यातून या ओवीत किती लाडिकपणा आला आहे! नादात हा लडिवाळपणा आहे, कारण तो श्रीकृष्ण आणि अर्जुन या नात्यात आहे. त्या दोघांतील प्रेम इतकं उत्कट आहे! तीच जवळीक, उत्कटता ज्ञानदेवांनी या ओवीत ओतली आहे. ज्ञानदेवांच्या ठिकाणी या नादाचं, लयीचं विलक्षण भान आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीत याचा अनुभव पुन्हा पुन्हा येतो.
इथे याचं नादगुणाचं साजिरं रूपडं आहे. तसेच त्यातील अर्थही किती महत्त्वाचा आहे! श्रीकृष्ण हे गुरू म्हणून किती श्रेष्ठ आहेत, हे यातून कळतं. ‘गुरू’ शब्दाचा अर्थ आहे ‘अंधाराचा नाश करणारा!’ त्यानुसार श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनातील मोह, अंधार दूर केला आहे. त्याला ‘आत्मज्ञान’ दिलं आहे. श्रीकृष्ण एक समर्थ गुरू! म्हणून ते जाणतात. हे ज्ञान पुन्हा एकदा अर्जुनाला द्यायला हवं. कारण ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्जुनाच्या मनात हीच इच्छा आहे की, गुरूंनी पुन्हा एकवार हे ज्ञान द्यावं.
गुरू-शिष्याचं असं हे अनोखं नातं! हे नातं कसं आहे? तर ज्ञानदेव पुढे दाखला देतात, कासवीच्या दृष्टीला, पिल्लं पाहताक्षणीच पान्हा फुटतो आणि ती तृप्त होतात किंवा आकाश हे चातक पक्ष्यांसाठी सर्व काळ पाणी पोटात बाळगते. या दाखल्यांत किती उत्कटता आहे आणि विविधताही आहे!
जमिनीवर असणारी कासवी नजरेनेही पिल्लांवर प्रेम करणारी! तिथून पुढे येणारा दाखला आकाशाचा. त्यातून पडणाऱ्या पावसाचा. ज्ञानदेव जमिनीवरून एकदम उंच आकाशात आपल्याला नेतात आणि पुन्हा जलधारांच्या रूपाने भूमीवर आणतात. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेची ही उंच भरारी आहे, जी या दाखल्यांतून दृश्य होते. या ओवीतून ते आपल्याला जणू जमीन ते अंतराळ आणि पुन्हा भूमी असा प्रवास, नव्हे यात्रा घडवतात.
श्रीकृष्ण-अर्जुन प्रेमाचं वर्णन करताना याप्रमाणे ज्ञानेश्वर वाचक, श्रोत्यांचं उन्नयन करतात, त्यांची पातळी उंचावतात.श्रीकृष्ण-अर्जुन या दोघांतील भक्तिभावाचं वर्णन करताना या दाखल्यांच्या पुढे एक ओवी येते. त्यात श्रीकृष्णांच्या तोंडी येतं, ‘आमच्या अगदी जीवीचे गुह्य तुला मी सांगतो. कारण एकनिष्ठ भक्ताचे आम्ही भुकेले आहो.’ ती ओवी अशी - म्हणौनि जिव्हारींचें गुज। सांगतसें जीवासी तुज। हें अनन्यगतींचे मज। आथी व्यसन॥ ओवी क्र. १३४९
भक्त अर्जुन, देव श्रीकृष्णांचा भुकेला आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या भक्तीचे भुकेले! हाच भाव आणि हीच भक्ती आजच्या काळात आपली शक्ती!
जय श्रीकृष्ण! जय ज्ञानदेव!