
मुंबई: स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी आणि त्याआधी आलेली शनिवारी रविवारची सुट्टी अशा लाँग वीकेंडमुळे पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळांना भेटी देणे पसंत केले. राज्यात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र ही सुट्टी एका तरूणाच्या जीवावर बेतली.
राजगडावर फिरायला गेलेल्या एका पर्यटकाचा तेथीलच पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटेच्या वेळेस ही दुर्घटना घडली.पुण्याच्या राजगड किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून एका तरूणाचा मृत्यू झाला. अजय मोहन कल्लामपारा असे या मृत तरूणाचे नाव आहे. तो ३३ वर्षांचा होता.
अजय ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहत होता. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करत होता. सलग सुट्टी आल्याने अजय आपल्या मित्रांसोबत किल्ल्यावर फिरायला आला होता. तो आणि त्याचे मित्र असे चौघेजण किल्ल्यावर आले होते.
कशी घडली दुर्घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा मित्रांसोबत सोमवारी किल्ल्यावर होता. सोमवारच्या रात्री तो किल्ल्यावरील पद्मावती टाकीत पाणी काढण्यासाठी गेला. मात्र पाणी काढत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत पडला. रात्रीच्या वेळेस काळोख असल्याने अजय कुठे गेला याचा शोध काही त्याच्या मित्रांना लागेना. त्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही. सकाळी जेव्हा त्यांनी पुन्हा अजयला शोधले तेव्हा त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत होता.