
मुरूड : मुरूड-अलिबाग मार्गावरील साळाव पुलाच्या दुरुस्तीमुळे सुमारे दोन महिने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या मार्गावर धावत असलेली लाल परी ही सुद्धा बंद केली होती. त्यामुळे असंख्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.
अखेरीस १४ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १२ टनाखालील वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. परंतु काही अपवादामुळे १४ जूनपासून लाल परी धावू शकली नाही. अखेरीस १३व्या दिवशी लालपरीला हिरवा कंदील दाखवला आणि २३ जून रोजी सायंकाळी सराव वाहतूक म्हणून मुरूड - रेवदंडा गाडी सोडली. त्यानंतर रात्री ११ वाजता मुरूड - मुंबई एसटी सेवा सुरू केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मुरूड अलिबाग मार्गावर पुन्हा एकदा साळाव पुलावरुन लाल परी धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या पुलावरुन एसटी सेवा बंद केल्याचा मोठा फटका मुरूड एसटी आगाराला बसला होता. या आगाराचे उत्पन्न ६ लक्षावरुन २ लक्षावर आले होते. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.