Tuesday, May 13, 2025

कोलाजसाप्ताहिक

लहान गोष्टींतला आनंद

लहान गोष्टींतला आनंद

ओंजळ : पल्लवी अष्टेकर

खरोखरच छोट्या गोष्टींतला आनंद आपल्याला मिळतो का? की मिळणाऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याच दुःखात चूर राहण्याचा प्रयत्न करतो? सतत मोठ्या आनंदाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा लहान-सहान गोष्टींतला आनंद वेचत राहाणे जरुरीचे आहे.

जागतिक ‘हॅपीनेस इंडेक्स’मध्ये १३७ पैकी भारताचा नंबर हा १२६वा लागतो, तर फीनलँडचा पहिला. मग भारताचा नंबर इतक्या खाली का? वाढती शहरे, त्यातून शहरातून होणारी अतिगर्दी, गरिबीमुळे लोकांमध्ये असणारी मूलभूत गरजांविषयी असुरक्षितता, पर्यावरणाचे असंतुलन अशा एक ना अनेक गोष्टी यासाठी जबाबदार आहेत.

जगात ‘हॅपीनेस इंडेक्स’मध्ये फीनलँडचा पहिला क्रमांक येण्याची कारणे म्हणजे, हा देश अतिशय स्थिर व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य मानला जातो. असे अनेक सर्व्हेक्षणातून विविध संस्थांच्या लक्षात आले आहे. यासाठी गॅलअपकडून ‘ग्लोबल पोलिंग डाटा’ सर्व्हेक्षणासाठी वापरला गेला. यात अनेक समस्यांवर मात करण्यासाठी सामाजिक पाठिंबा, आरोग्यपूर्ण आयुष्याच्या अपेक्षा, आपल्या इच्छेनुसार जगण्याचे स्वातंत्र्य, दानीपणा, भ्रष्टाचारमुक्त देश व प्रत्येक व्यक्तीमागचे ग्राॅस डोमेस्टिक प्राॅडक्शन (GDP) इ. गोष्टींचा समावेश आहे. याचा अर्थ जगात जिथे सुद्धा समाधानकारक समाज आहे, तिथली सामाजिक व्यवस्था लोकांसाठी पाठिंबा देणारी आहे. तिथे लोक अचानकपणे कोसळत नाहीत. एखाद्या संकटाने (भूकंप, पूर इ.) घाबरून जात नाहीत.

भूतान या देशात ग्रॉस नॅशनल हॅपीनेस या गोष्टीला खूप महत्त्व आहे. संपूर्ण समाजाचा व लोकांचा आनंद यात मोडतो. त्यांच्या विकासाच्या मार्गात ऐहिक संपत्ती भोगाला महत्त्व दिलेले नाही. त्यामुळे एक आनंदी देश म्हणून भूतानकडे पाहिले जाते.

जरी या गोष्टी सरकारवर अवलंबून असतील तरी प्रत्येक व्यक्तीला त्याबाबत काय करता येईल? त्यानंतर प्रश्न पडतो की, खरोखरच छोट्या गोष्टींतला आनंद आपल्याला मिळतो का? का मिळणाऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याच दुःखात चूर राहण्याचा प्रयत्न करतो? खरं तरं आपल्या आयुष्यात अनेक लहान-सहान आनंदमय प्रसंग येत असतात. छोटी विद्या आपल्या अंगणातील रोपट्यांना, झाडांना पाणी घालून निर्भेळ आनंद मिळवते. त्यांना फुले आली की, तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. आंब्याचे, चिकूचे, चाफ्याचे झाड तिच्या अंगणात आहे. तिचे बाल मित्र-मैत्रिणी तिच्याकडे खेळायला आले की तिखट-मीठ लावलेल्या कैऱ्या, चिकू खात त्यांना भातुकलीचा खेळ खेळायला आवडते.

खरं तर लहान मुले या आनंदाजवळ फार लवकर पोहोचतात व तो त्यांच्याजवळ भरपूर वेळ टिकतो देखील. साबणाचे फुगे उडविणे, आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांकडे पाहणे, कुत्र्याच्या छोट्याशा पिल्लांसोबत खेळणे, पावसाळ्यात पाणी साठलेल्या डबक्यांतून कागदी नावा करून सोडणे याच्यातला तुमचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

आपल्या आयुष्यात चांगल्या घडणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता ठेवायला हवी. अचानक येणारी एखादी पावसाची सर, वाऱ्याची झुळूक, ढगांचे विविध रंग मनाला स्पर्शून जातात. हिरवीगार वनराई, पाण्याने तुडुंब भरलेले तलाव, गवतांच्या कुरणात चरणाऱ्या गाई-म्हशी, मेंढ्या अशी निसर्गाची किमया माणसाचे मन प्रसन्न करते. त्यामुळे निसर्गाच्या विविध लीलांमधून आनंद मिळवणारे लोक मुद्दाम पावसाळी सहलींचे आयोजन करतात व मनमुरादपणे निसर्गाच्या विलोभनीय रूपांमध्ये स्वतःला सामावून घेतात.

चांगल्या कृतीतून मिळणारा आनंद हा चिरंतन टिकणारा असेल. विनायक हा अत्यंत गरीब परिस्थितीतला मुलगा होता. घरच्या गरिबीमुळे त्याचे वडील हमालीचे काम करीत. त्याला तीन लहान भावंडे होती. त्यांना सांभाळत त्यांची आई धुण्या-भांड्याची कामे करीत असे. आजूबाजूची शाळेत जाणारी, हसणारी-खेळणारी मुले पाहून त्याला देखील शाळेत जावेसे वाटू लागले होते. “माय, मलाबी साळतं जायचयं, बुकं शिकून हाफिसर व्हायचयं” तो आपल्या आईला म्हणायचा. “पैकं नाईत पोरा, तू साळतं जाणार म्हटलास, तर तुजी समदी भावंडं माझ्याजवळ हट्ट धरतील.” मग विनायकचे तोंड एवढेसे होऊन जाई. शेवटी एकदा न रहावून विनायकच्या आईने, वैजयंती काकूंपाशी, आपल्या एका कामावर त्याच्या शाळेचा विषय काढला. आपल्यापाशी मुलांच्या फी, पुस्तकं, गणवेशासाठी पैसे नाहीत हेही सांगितलं. विनायकची आई जिथे-जिथे कामाला जाई ती सुखवस्तू कुटुंब होती. वैजयंतीकाकूंना विनायकच्या आईची व्यथा समजली. त्यांनी तिला मदत करण्याचे ठरविले व दरमहा काही रक्कम विनायकच्या शिक्षणासाठी द्यायची ठरविली. त्याच्या आईला या गोष्टीचा खूप आनंद झाला व तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

एकदा मी माझे नवीन प्रसिद्ध झालेले पुस्तक ‘सुट्टीतील मज्जा’ प्रसिद्ध लेखिका माननीय डॉ. विजया वाड यांना वाचनासाठी कुरिअरने पाठवून दिले. पुस्तक पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी वाड ताईंचा मला फोन आला, “बाळ, असेच लिहीत जा. आता मी तुझे पुस्तक घेऊन अंधशाळेतल्या मुलांना गोष्टी सांगायला जात आहे” हे ऐकून मला खूप आनंद झाला. पुस्तकातल्या गोष्टी मुलांना कशा वाटल्या ते सांगा, असा निरोप मी वाडताईंना दिला.

अभिषेक नुकताच पाच वर्षांचा झाला होता. त्याने अजून समुद्र फक्त चित्रातच पाहिला होता. यंदाच्या त्याच्या वाढदिवसाला त्याच्या आई-वडिलांनी त्याला व सोसायटीतील सर्व मुलांना समुद्रकिनाऱ्याची सफर घडवून आणण्याचे ठरविले. आजची सुट्टीतील संध्याकाळ खूप धमाल करायला मिळणार म्हणून मुलांना अतिशय आनंद झाला. मुलांनी आपल्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर लागणारी खेळणी पण घेतली. पायाशी मऊशार वाळू, मध्येच डोकावणारे शंख शिंपले, आजूबाजूला नारळाची झाडे हे दृश्य पाहून मुले सुखावली. वाळूत घरे करणे, समुद्रकिनाऱ्यावरील लाटांसोबत खेळणे यात बालचमूचा वेळ कसा पटकन निघून गेला ते समजलेच नाही. अभिषेकच्या आई-बाबांना देखील यासाठी समाधान वाटले. मनसोक्त खेळून झाल्यावर त्यांनी सर्व मुलांना भेळपुरी, शहाळ्याचे पाणी असा खाऊ देऊन घरी परत आणले. मुलांसोबत वाळूत वेचलेले सुंदर, विविध रंगी शंख शिंपले होते. मुलांनी एवढ्या छान वाढदिवसाबद्दल अभिषेकच्या पालकांचे आभार मानले व ते आनंदी, प्रसन्न मनाने घरी गेले.

आयुष्यात लहान गोष्टींनी आनंदाची पोतडी भरली पाहिजे, जेणेकरून दुःखाला सामोरे जाण्याची ताकद त्यातून मिळेल.सतत मोठ्या आनंदाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा लहान-सहान गोष्टींतला आनंद वेचत राहाणे जरुरीचे आहे, तरच अपेक्षा भंगाचे दुःख होणार नाही. असा हा आनंदाचा ठेवा. जेवढा आपण एकमेकांना लुटू, तेवढा तो वाढतच जाईल.

संत तुकारामांनी खालील अभंगात अशा शब्दात आनंद व्यक्त केला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे...

Comments
Add Comment