Tuesday, May 13, 2025

कोलाजसाप्ताहिक

सुख आणि आनंद...

सुख आणि आनंद...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

सुख आणि आनंद हे शब्द समानार्थी वापरत असलो तरी त्यात मूलभूत फरक आहे. सुख हे नेहमी बाह्य वस्तूवर किंवा व्यक्तीवर अवलंबून असतं, तर आनंद हा आंतरिक व त्यागावर आधारित असतो.

फार वर्षांपूर्वीची गोष्ट... हरिद्वारला गंगेच्या काठावर एका देवळासमोरच्या प्रांगणात बसून एक म्हातारा एकतारी हातात घेऊन गात होता.

तसा तो दररोजच तिथं बसायचा, एकतारीच्या तालावर भजनं गायचा. त्याच्या समोर एक पंचा पसरून ठेवलेला असायचा. देवळात येणारे भाविक यात्रेकरू काही काळ थांबून भजनं ऐकायचे आणि पै पैसा त्या म्हाताऱ्याच्या समोर टाकून निघून जायचे.

त्या दिवशी देखील तो म्हातारा नेहमीच्या जागेवर बसला होता. पण... पण खोकल्यामुळे त्याला गाताना खूप त्रास होत होता. तरीही तो खोकत खोकत गात होता. गाणं नीट न झाल्यामुळे त्याचं भजन ऐकायला कुणीही थांबत नव्हतं. हां हां म्हणता दुपार उलटून गेली, सूर्य मावळतीला झुकायला आला तरीही त्याच्या समोरच्या पंचावर एकही नाणं पडलं नव्हतं.

तेवढ्यात देवदर्शनाला आलेल्या एका मध्यमवयीन माणसानं त्या म्हाताऱ्याला पाहिलं आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, ‘बाबा, तुम्हाला गाताना फार त्रास होतोय. ती एकतारी माझ्याकडे द्या. आज मी गाणं म्हणतो. बघू या मला जमतंय का ते?’ बोलता बोलता तो माणूस त्या म्हाताऱ्याच्या शेजारी मांडी घालून बसला आणि म्हाताऱ्याच्या हातातली एकतारी घेऊन गायला सुरुवात केली.

पुढचे दोन तास तो माणूस एकतारीच्या तालावर गाणी गात होता. गाताना ताना-पलटे सरगम छेडत होता. ते स्वर्गीय सूर ऐकून जाणारे येणारे थांबले. भाविकांची ही गर्दी देवळासमोर जमली. म्हाताऱ्यासमोर पसरलेऱ्या पंचावर नाण्यांचा, नोटांचा ढीग जमा झाला होता. ते सगळे पैसे त्या माणसानं त्या म्हाताऱ्याला दिले आणि नमस्कार करून जायला वळला.

कोण होता तो माणूस? त्या माणसानं आपलं नाव कुणाला सांगितलं नसलं तरी जमलेल्या गर्दीमधील काही दर्दी लोकांनी मात्र त्याला ओळखलं आणि त्याच्याजवळ धाव घेतली. त्याच्या पाया पडायला, त्याची सही घ्यायला.

त्या माणसाचं नाव होतं. पंडित ओंकारनाथ ठाकूर. भारतीय संगीतामधील एक उत्तुंग शिल्प, पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य पंडित कुमार गंधवांचे गुरू, ग्वाल्हेर घराण्यातील एक लखलखता हिरा.

पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा हा किस्सा मी माझे गुरू पंडित यशवंत देव यांच्या तोंडून ऐकला होता. ऐकताना माझं अंग रोमांचित झालं होतं. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. त्या काळात ज्यांना एकेका मैफलीचे हजारो रुपये मानधन मिळत होतं. देश-विदेशात ज्यांचं गाणं ऐकण्यासाठी लोक महागडी तिकिटं विकत घेऊन कार्यक्रमाला जात असत, त्या पंडितजींनी एका म्हाताऱ्या भिकाऱ्याशेजारी बसून एकतारी वाजवीत गाणं म्हटलं आणि जमा झालेले सगळेच्या सगळे पैसे त्या म्हाताऱ्याला देऊन टाकले.

का? कशासाठी? काय मिळालं असेल पंडितजींना? नावासाठी, प्रसिद्धीसाठी म्हणवं तर त्यांनी आपलं नाव देखील कुणाला सांगितलं नव्हतं. लोकांनी त्यांना ओळखलं तो भाग वेगळा. पण तरीही पंडितजींना काहीतरी मिळालंच... त्यांना जे मिळालं ते पैसा आणि प्रसिद्धीच्या फार फार पलीकडचं होतं. त्यांना मिळाला आनंद. पंडितजींनी जे काही केलं ते त्या भिकाऱ्यासाठी नव्हतंच. गाणं गाताना आणि गाणं ऐकून लोकांनी समोर टाकलेले सगळे पैसे त्या म्हाताऱ्याला देताना पंडितजींना जो सात्त्विक आनंद मिळाला असेल, त्याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही.

आपण सर्वसामान्य माणसं जे काही करतो त्यामागे प्रामुख्याने तीन हेतू असतात, पैसा, प्रसिद्धी म्हणजे मोठेपणा मिळवणं आणि देहसुख म्हणजेच शरीराचे चोचले. कोणतीही गोष्ट करताना आपण यातून आपला फायदा काय? आपल्याला काय मिळणार याचा विचार करतो. जर पैसा, प्रसिद्धी आणि देहसुख या तिन्हींपैकी काहीच मिळणार नसेल, तर मी ही गोष्ट का करावी? असा सर्वसामान्य विचार करणारी माणसं आयुष्यभर सामान्यच राहतात. केवळ दृष्य फायद्याचा विचार करतात. केवळ नफा आणि नुकसान यांचाच विचार करून कृती केल्याने आयुष्यात भव्य दिव्य असं काही घडत नाही.

सामान्य म्हणून जन्माला येतो आणि सामान्य म्हणूनच मरतो. केवळ मी आणि माझं या एकाच केंद्रबिंदूभोवती आयुष्य फिरत न राखता ‘मी’चा परिघ व्यापक करून किंबहुना त्या परिघाबाहेर पडून कार्य करणाऱ्या माणसाला केवळ सुख मिळत नाही. त्याला मिळतो तो आनंद.

सुख आणि आनंद हे दोन्ही शब्द आपण समानार्थी वापरत असलो तरी त्यात मूलभूत फरक आहे. सुखाच्या विरुद्ध शब्द दुःख. पण आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सुख हे नेहमी बाह्य वस्तूवर किंवा व्यक्तीवर अवलंबून असतं, तर आनंद हा केवळ आंतरिक असतो. आत्मीक असतो. सुख उपभोगलं जातं. आनंद हा आपोआप मिळतो. सुख भोगावर अवलंबून असतं त्यामुळे भोगून सपलं की ते कमी होतं. संपून जातं. आनंद त्यागावर आधारित असतो. तो अखंड टिकून राहातो. सुख हे अपेक्षापूर्तीवर आधारलेलं असतं, आनंद हा नेहमीच निरपेक्ष असतो. सुख विकत घेता येतं. आनंद हा स्वतःजवळचं काहीतरी दिल्यानं मिळतो...

सहज आठवली म्हणून एक गोष्ट सांगतो... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन एकदा कुठल्याशा समारंभाला चालले होते. मोटारीतून जाताना त्यांना सहज बाहेर पाहिलं. रस्त्याच्या कडेला डुकरं फिरत होती. पण एक पिल्लू मात्र गटारात पडलेलं त्यांना दिसलं. ते पिल्लू बाहेर येण्यासाठी धडपडत होतं. जीवाच्या आकांतानं केकाटत होतं. लिंकननी ते पाहिलं. पण तोवर मोटार पुढे निघून गेली होती. मैलभर पुढे गेल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला मोटार थांबवून मागे वळवायला सांगितली. लिंकन त्या गटाराजवळ गेले. ते पिल्लू अद्यापही बाहेर येण्यासाठी धडपडत होतं. केकाटत होतं. अब्राहिम लिंकननी अंगातला कोट काढून ठेवला आणि पँट थोडी फोल्ड करून गटारात पाऊल टाकलं. दोन्ही हातांनी त्या पिल्लाला उचलून बाहेर काढलं आणि त्या चरणाऱ्या डुकरांत नेऊन ठेवलं. हे सगळं करताना काळजी घेऊनही त्यांच्या कपड्याना थोडासा चिखल लागलाच. त्यांनी जवळच्या सार्वजनिक नळावर जाऊन हात धुतले. जमतील तेवढे डाग पुसून ते त्या समारंभाला गेले. अब्राहिम लिंकन स्वतः जरी बोलले नाहीत तरी यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बातमी पत्रकारांना सांगितली. दुसऱ्या दिवशीच्या पेपरात ही बातमी छापून आली. अब्राहिम लिंकनवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. त्यानंतर लागलीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की... ‘मी जे काही केलं, ते त्या डुकराच्या पिल्लासाठी केलेलं नाही. मी जर त्या पिल्लाला गटारातून बाहेर काढलं नसतं तर त्या पिल्लाचं केकाटणं आणि तडफड माझ्या मनात सतत राहिली असती. माझं समारंभात लक्ष लागलं नसतं. माझ्या मनाची अस्वस्थता संपवण्यासाठी मी चिखलात उतरलो.’

दुसऱ्याच्या दुःखानं द्रवणं हाच तर थोरांच्या जीवनाचा स्थायीभाव असतो. सेवा करण्यातच त्यांना आनंद लाभतो. आपण सर्वसामान्य माणसं प्रत्येक गोष्टीत स्वार्थ म्हणजेच स्व-अर्थ शोधतो. हा स्वार्थ काहीकाळ बाजूला ठेवून आपल्याला थोडंफार जगणं शक्य नसतं का? अगदी घर-संसार सोडून नव्हे पण दिवाळीला स्वतःसाठी दोन कपडे कमी घेऊन ते पैसे एखाद्या महिलाश्रमाला भाऊबीज म्हणून पाठवणं शक्य असतं. मुलांचा-नातवंडांचा वाढदिवस साजरा करतानाच काही रक्कम जवळच्या अनाथाश्रमासाठी खर्च केली तर? एखादा सिनेमा न पाहता, हॉटेलमध्ये न जेवता त्याच पैशातून एखाद्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्याला वह्या पुस्तकं घेऊन दिल्या टीव्हीवर घरगुती कलहाच्या न संपणाऱ्या मालिका किंवा केवळ करमणूक करणारे क्रिकेटचे सामने न पहाता एखाद दिवशी एखाद्या वृद्धाश्रमाला भेट देऊन तिथल्या वृद्धांबरोबर बसून गप्पा मारल्या तर. एखाद्या वर्षी सुट्टीत बाहेर फिरायला न जाता त्या पैशातून एखाद्या गरीब आजारी माणसाला थोडीफार वैद्यकीय मदत करणं शक्य नसतं का?

आपल्या स्वार्थाला थोडी मुरड घालून, मी आणि माझं या परिघाबाहेर उतरून असं काही करून तर बधू या. प्रापंचिक सुख तर नेहमीच उपभोगतो. कधीतरी निरपेक्ष आत्मीक आनंदाचाही अनुभव घेऊया.

Comments
Add Comment