Tuesday, May 6, 2025

कोकणरत्नागिरी

सावरकर विचार जागरण सप्ताहाची आज सांगता

सावरकर विचार जागरण सप्ताहाची आज सांगता

रत्नागिरी : गेले आठवडाभर रत्नागिरीसह राज्यात पाच ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. या सप्ताहची सांगता ता. २८ शोभायात्रा, सहभोजनाने होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमासाठी ऐतिहासिक पतितपावन मंदिराची निवड झाली आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, तसेच राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

शासनाने वीरभूमी परिक्रमेंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था व श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅली, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प, त्या तिघी नाट्यप्रयोग होईल. रविवारी सकाळी ८ वाजता कारागृह सावरकर स्मारक येथून शोभायात्रेला सुरुवात होईल. वीर सावरकरांची दि. २८ रोजी १४० वी जयंती असून सकाळी ८ वाजता कारागृह येथील स्वा. सावरकर स्मारक येथून शोभायात्रा निघणार आहे. जयस्तंभ, एसटी स्टँड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रेची सांगता होईल. यात विविध संस्थांचे चित्ररथ सहभागी होतील. शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचल्यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान मंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक रवींद्र भोवड, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, माजी अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर यांनी केले आहे.

मंगल प्रभात लोढा करणार मार्गदर्शन

मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे येथे आगमन झाल्यावर १९५ वर्षे पूर्ण झालेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयास सदिच्छा भेट देतील. भाजप कार्यालयात लोकसभा कोअर समिती सदस्य बैठक, शहर बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन, सप्ताहानिमित्त आयोजित शोभायात्रेत सहभाग, सकाळी ११ वाजता पतितपावन मंदिरात मन की बात कार्यक्रमास उपस्थिती, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक.

Comments
Add Comment