Sunday, May 11, 2025

ताज्या घडामोडीपालघर

आंब्याचे दर अजूनही कडाडलेलेच

आंब्याचे दर अजूनही कडाडलेलेच

वाडा (वार्ताहर) : या वर्षीच्या लहरी हवामानामुळे कोकणातील आंबा हा पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कमी प्रमाणात आला आहे. मात्र कर्नाटक, आंध्र प्रदेश व वापी (गुजरात) या परराज्यांतील आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. इतर राज्यांतील आंबा कोकणातील हापूसच्या नावे ग्राहकांच्या माथी मारून भक्कड पैसा व्यापारी कमवित आहेत. आंब्याचे दर अजूनही कडाडलेलेच असून, येथील स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या रायवळी, हापूस, केशराच्या प्रतीक्षेत येथील खवय्ये आहेत.

पालघर जिल्ह्यात १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आंबा पीक घेतले जाते. विशेषत: या ठिकाणी पिकविला जाणारा हापूस, केशर आंब्याची चव अप्रतिम असते. कुठल्याही प्रकारचे रासायनिक पावडर, द्रवपदार्थ न वापरता नैसर्गिक पिकवून येथील आंब्यांची विक्री केली जाते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील आंबा ग्रामीण भागातील बाजारपेठांना दाखल होताच काही दिवसांताच पालघर जिल्ह्यातील रायवळ, हापूस, केशर आंबा दाखल होतो, मात्र या वर्षीच्या हवामान बदलाचा मोठा फटका येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

पालघर जिल्ह्यातील बोईसर, वसई, पालघर, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार येथील बाजारपेठेत बहुतांशी आंबा हा परराज्यातील असून स्थानिक हापूसच्या नावे ग्राहकांच्या माथी मारला जात आहे.

येत्या आठ दिवसांत स्थानिक हापूस, केशरचे आगमन बाजारपेठेत होईल, ग्राहकांनी स्थानिक आंब्याला पसंती द्यावी. - मोहन एकनाथ पाटील, (आंबा उत्पादक शेतकरी, ता. वाडा)

मधला दलालच आंबा विक्रीतून अधिक पैसे कमावितो़ आंबा नाशवंत असल्याने १५ ते २० टक्के आंबे खराब होत असतात. - विलास गायकवाड, (फळविक्रेता, वाडा)

स्थानिक शेतकऱ्यांचा आंबा बाजारपेठांमध्ये दाखल होण्याआधीच कर्नाटक, आंध्र प्रदेश, वापी (गुजरात) येथील आंबा मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. कर्नाटकी हापूस, केशर ६०० ते ७०० रुपये डझन, तर दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. कर्नाटकी आंबा दिसायला रत्नागिरी हापूससारखाच दिसायला असला, तरी त्याच्या चवीत फरक आहे. अधिक नफ्यासाठी ही विक्री केली जाते़

स्थानिक आंब्यांचे उशिरा आगमन या वर्षीच्या ढगाळ वातावरणात ५० टक्के मोहोर जळून गेला, त्यानंतर आलेल्या अवेळी पावसामुळे २५ टक्के मोहोर, लहान कैरी गळून गेली. उर्वरित आंबे अजूनही बाजारात न आल्याने या रायवळी, हापूस, केशरच्या प्रतीक्षेत येथील खवय्ये आहेत.

Comments
Add Comment