
नवी दिल्ली : राज्यसभेतील आजच्या भाषणावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसने देशाचे वाटोळे केले. देशाच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याऐवजी काँग्रेसने ६० वर्षात केवळ खड्डेच खड्डे खोदून ठेवले आहेत, अशी टीका मोदी यांनी सभागृहात केली.
मोदी पुढे म्हणाले, आमच्या सत्ताकाळात आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणींपासून पळण्याची आमची वृत्ती नाही. आम्ही त्यावर उपाय शोधणारे आहोत.
यावेळी विरोधकांनी 'मोदी-अदानी भाई भाई' अशी घोषणाबाजी केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींना पाठिंबा दर्शवला. पण या गोंधळात मोदींनी आपले भाषण सुरुच ठेवले. यावेळी विरोधकांचा अधिक समाचार घेत मोदींनी देशात कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान आहे, असा टोला लगावला. विरोधक जितके चिखल फेकतील तितकेच कमळ चांगले फुलेल, असे मोदी म्हणाले.
राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, खर्गेजी! फक्त कर्नाटकमध्ये एक कोटी ७० लाख जनधन बँक खाती उघडली आहेत. इतकेच नाही, त्यांच्याच कलबुर्गीमध्ये आठ लाखांपेक्षा जास्त जनधन खाती उघडण्यात आली आहेत. इतकी बँकेची खाती उघडली त्यामुळे लोक इतके जागरुक होत असतील तर आता कुणाचं खातं बंद होत असेल तर काय करायचं.. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्गे यांना लगावला.