Tuesday, May 13, 2025

महत्वाची बातमीपालघर

आजही येथे रुग्ण डोलीतून आरोग्यकेंद्रात येतात...

आजही येथे रुग्ण डोलीतून आरोग्यकेंद्रात येतात...

वामन दिघा मोखाडा : १ लाख लोकसंख्या असलेला आणि जवळपास ९९ टक्के आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यातील आरोग्यकेंद्रे केवळ शोभेच्या वास्तू बनत चाललेल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपुऱ्या सुविधांअभावी या डोंगर, दरी-खोऱ्यांच्या परिसरातील ग्रामस्थांना उपचारासाठी नाशिक, मुंबई, ठाणे गाठावे लागत आहे़.

मोखाडा तालुक्यात आसे, मोर्हांडा, वाशाळा, खोडाळा ही चार प्राथमिक आरोग्यकेंद्र आहेत. एकीकडे शासन दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च प्राथमिक आरोग्यकेंद्रावर करीत असतांनाही आजही दुर्धर आजारांवरील उपचारासाठी ग्रामस्थांना मात्र ग्रामीण रुग्णालय अथवा शहरी जावे लागत आहे.

आजही या परिसरात कुपोषण, बालमृत्यू पूर्णत: थांबलेले नाहीत. विशेषत: धामोडी, कुडवा, करोळी, धामणी, बिवलपाडा हे गावपाडे आजही आरोग्य सेवांपासून वंचित आहेत. तालुक्यापासून या गावांकडे जाणारे रस्ते सुस्थितीत नसल्याने या गावांतील रुग्णांना, गरोदर मातांना आरोग्यकेंद्रात येताना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत़. आरोग्यकेंद्राचे अथवा खासगी वाहन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने आदिवासी रुग्णांना डोलीचा आधार घेत आरोग्यकेंद्र गाठावे लागत आहे.

Comments
Add Comment