Tuesday, May 6, 2025

रायगड

माथेरानमध्ये ई-रिक्षामुळे पर्यटकांना अनेक फायदे

माथेरानमध्ये ई-रिक्षामुळे पर्यटकांना अनेक फायदे

माथेरान: दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या माजी लोकप्रतिनिधींनी एकमताने ठराव पारित केल्यामुळे सध्या माथेरानसारख्या डोंगराळ भागात अनेक अडचणींचा सामना करीत पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू झाल्यामुळे अत्यंत स्वस्त, सुरक्षित आणि सुलभ प्रवास मिळत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माथेरानमध्ये घोडा आणि मानवचलित हातरिक्षा हीच मुख्य प्रवासी वाहने आजतागायत उपलब्ध आहेत, परंतु कष्टकरी हातरिक्षाचालकांना या अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी, त्यांनाही सन्मानाचे जीवन जगता यायला हवे, यासाठी निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी सर्वस्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, याठिकाणी पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते आबाल-वृद्ध, पर्यटकांसाठी तर ही जीवनवाहिनी बनली आहे. महात्मा गांधी मार्ग या मुख्य धूळविरहित रस्त्यांची कामेसुध्दा युद्धपातळीवर सुरू आहेत, त्यामुळे येथील धुळीला हद्दपार करण्यासाठी क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते हा आगामी काळात सर्वांसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. दस्तुरी नाकापासून गावात येण्यासाठी अनेकदा रात्रीअपरात्री स्थानिकांना, तसेच पर्यटकांना खूपच त्रासदायक बनले होते, त्यामुळेच ई-रिक्षा सारखी स्वस्त, सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची उत्तम सोय निर्माण झाल्यामुळे पर्यटकांसह येथील स्थानिकांमध्येही आनंदाचे वातावरण दिसत आहे.

५ डिसेंबर २०२२ पासून ही सेवा सुरू झाली असून, ५ जानेवारीपर्यंतच्या एका महिन्यात जवळपास एक लाख पर्यटकांनी येथे हजेरी लावली. याच माध्यमातून नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळेच पर्यटक वाढले तर आपसूकच येथील सर्वच व्यावसायिकांना चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता अल्पावधीतच सर्वांना ई-रिक्षाचा लाभ होणार आहे. सुरुवातीपासूनच सर्व पक्षांच्या नेत्यांनी बळ दिल्यामुळे तसेच सुनील शिंदेंचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा, जिद्द आणि चिकाटीमुळे आज माथेरानमध्ये ई-रिक्षा सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहे. झटपट, स्वस्तात प्रवासाची उत्तम सोय या माध्यमातून सुरू झाल्याने ई-रिक्षाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Comments
Add Comment