
कुडाळ : कोकण दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. राज ठाकरे यांचा दौरा पूर्वनियोजित असूनही पदाधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा थांगपत्ताच नव्हता. परिणामी, राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मनसे कार्यकारिणी थेट बरखास्त केली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याची वेगळ्या अर्थाने जोरदार चर्चा सुरु आहे.
राज ठाकरे यांचा दौरा पूर्वनियोजित असल्याने कार्यकर्त्यांना या दौऱ्याची माहिती असणे अपेक्षित होते. परंतू, राज ठाकरे प्रत्यक्ष दौऱ्यावर येऊनही कार्यकर्त्यांना याबाबत माहिती असल्याची कोणतीच बाब दिसली नाही. परिणामी पक्षीय पातळीवर कडक पावले उचलत थेट कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा मनसे कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या निर्णयाची प्रसारमाध्यमांना माहिती देताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, पक्षकार्य आणि संघटना याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अनास्था दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने कडक कारवाई करण्यात आली. पक्षप्रमुखांचा दौरा ८ ते १० दिवस अगोदर पूर्वनियोजित असूनही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कल्पना दिली नाही. ही बाब पदाधिकाऱ्यांमध्ये गांभीर्य नसल्याचेच दर्शवते. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मनसे संघटन चांगले असले तरी स्थानिक पातळीवर असलेले गटातटाचे राजकारण पक्षासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे पक्षातील स्थानिक पातळीवरचे गट तट संपले पाहिजेत. त्याशिवाय पक्षवाढ होणार नाही. अनेक स्तरातील स्त्री-पूरुष पक्षासोबत येण्यास तयार आहेत. परंतू, असे असले तरी पदाधिकाऱ्यांमध्ये गट-तट असल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला बसतो आहे. पक्षात स्थानिक पातळीवर गट तट असल्याचे पाहायला मिळत असले तरी, राज ठाकरे आपला कोकण दौरा पूर्ण करतील, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.