
नवी दिल्ली: योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आहेत.
आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरण उत्तराखंडने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हवाला देत पतंजलीच्या दिव्या फार्मसीला दिव्या मधुग्रित, दिव्या आयग्रिट गोल्ड, दिव्या थायरोग्रिट, दिव्या बीपीग्रीट, आणि दिव्या लिपिडोम या पाच औषधांचे उत्पादन थांबवण्यास सांगितले आहे. पतंजलीच्या म्हणण्यानुसार, या औषधांचा वापर मधुमेह, डोळ्यांचा संसर्ग, थायरॉईड, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी केला जात होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, पतंजली समूहातून तयार करण्यात येत असलेल्या औषधांबाबत केरळचे डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती.
“पतंजलिची एक जाहिरात होती, ज्यामध्ये ते म्हणतात की, त्यांचे डोळ्याचे ड्रॉप काचबिंदू, मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर अनेक समस्यांसाठी उपयुक्त आहेत. मात्र यापैकी कोणत्याही समस्येवर उपचार न केल्यास ते अंधत्व आणू शकतात. अशा जाहिराती मानवी जीवनासाठी धोकादायक आहेत,” असे डॉ. बाबू यांचे म्हणणे आहे.
त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचे उत्पादन केले जात होते.
माहिती घेतल्यानंतर प्राधिकरणाने या औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश पतंजली समूहास देण्यात आले. तर, या औषधांचे पुन्हा उत्पादन करायचे असेल तर त्यासाठी पुन्हा परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे. तसेच आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचा आरोप रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीने करण्यात आला आहे.