
मुंबई : दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा बहुचर्चित 'हर हर महादेव' या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काल पुणे आणि मुंबईसह ठाण्यातील काही थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. चित्रपट आणि त्याच्यावरुन सुरु झालेला वाद यावरुन आता राजकीय वाद सुरु झाला आहे.
या सगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद सुरु झाला होता. अखेर त्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट फर्मान काढले आहे. त्यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटाबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरेंनी आपल्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत काहीही बोलू नका, असे सांगितले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हर हर महादेव या चित्रपटाबाबत भाष्य केले होते. त्यामध्ये ऐतिहासिक घडामोडींवरुन वाद निर्माण झाला होता. हर हर महादेवमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला होता. राष्ट्रवादी कॉग्रेसनं संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठींबा दिला होता. यासगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात वाद सुरु झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एका थिएटरमधून प्रेक्षकांना बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.
या सगळ्यात मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. तो संघर्ष आणखी वाढू नये यासाठी मनसेकडून पदाधिकाऱ्यांना काही सुचना देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात केवळ चित्रपटाचे दिग्दर्शकच बोलतील. बाकी कुणी नाही, असे स्पष्ट निर्देश राज यांनी दिल्याचे समजते.