Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

संभाजीराजेंपाठोपाठ संभाजी ब्रिगेडही आक्रमक

संभाजीराजेंपाठोपाठ संभाजी ब्रिगेडही आक्रमक

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच यापुढे चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखवला तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता संभाजी ब्रिगेड संघटनेकडूनही ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांना तीव्र शब्दांत इशारा देण्यात आला आहे.

“हर हर महादेव चित्रपट दाखवणे थांबवा. चित्रपटगृहात पडदे फाटल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाची मोडतोड करून ‘हर हर महादेव…’ चित्रपट तयार केलाय”, असा घणाघात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला.

“वेडात मराठे वीर दौडले सात… हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. अकराळ विक्राळा मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा”, असा हल्लाबोल संतोष शिंदेंनी केला.

“सुबोध भावे, अभिजीत देशपांडे, अक्षय कुमार किंवा महेश मांजरेकर… छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका. गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. चित्रपटगृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येऊ येणार नाही, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला. तसेच सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी”, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.

“मला आज सांगायचंय की, ऐतिहासिक सिनेमे निघतायेत ते कौतुकास्पद आहे. पण चित्रपटाच्या स्वातंत्र्यानुसार इतिहासातील घडामोडींची मोडतोड केली जातेय. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला चालणार नाही. हर हर महादेव हा चित्रपट जो प्रदर्शित झालाया त्यात इतिहासाची प्रचंड मोडतोड करण्यात आलीय”, अशी भूमिका संभाजीराजेंनी मांडली.

“जर यांनी असेच चित्रपट काढायला घेतले तर गाठ संभाजी छत्रपतीशी आहे. काढून तर बघुदेत. नाही आडवा आलो तर बघा. मीच आडवायला येणार. आमचा या घराण्यात जन्म होऊन उपयोग काय? वेळप्रसंग काहीही झालं तरी चालेल. पण असा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणत असाल तर याद राखून ठेवा”, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

Comments
Add Comment