
मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचा बंडखोर गट म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. दोघांना शिवाजी पार्क येथील मैदानावरच दसरा मेळावा घ्यायचा आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या पाठोपाठ आता मनसेच्या गोटातही दसरा मेळावा भरवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून पुढच्या काही दिवसांमध्ये राजकीय धूमशान रंगताना दिसणार आहे.
शिंदे गटाचाही अर्ज दाखल
दसरा मेळाव्याकरता शिवसेनेच्या ठाकरे गटासह आता शिंदे गटाकडूनही मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. सध्या दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. विचारांचं सोनं लुटून शिवसैनिक पक्षाचं काम जोमानं करायचा पण आता शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि सर्वच काही चित्र बदलून गेलं आहे. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह कोणाकडे जाईल अद्याप सांगता येत नाही. त्यात पक्षाच्या कार्यक्रमात देखील विभागण्या होताना दिसत आहे. हे सगळं सुरु असताना आता स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केला आहे. यापूर्वी शिवसेनेकडून दोन वेळा देण्यात आलेल्या अर्जावर मात्र मुंबई महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाने दसरा मेळाव्याची परंपरा कायम राखली आहे. यंदा शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाले आणि पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार हे निश्चितच होते. हा मेळावा एकनाथ शिंदे घेणार की उद्धव ठाकरे हाही प्रश्न होताच. मात्र आता हा दसरा मेळावा एकनाथ शिंदेच घेणार, अशी चिन्ह दिसत आहेत. शिवाजी पार्कवरच हा दसरा मेळावा घेता यावा यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार असल्याचे आता जवळपास निश्चित होऊ लागले आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी याबद्दल सर्व आमदारांना सूचनाही दिल्या आहेत.
यंदाच्या मेळाव्यामध्ये भाजपाही सहभागी होण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतून नाराज होऊन बाहेर पडलेले आणि आता भाजपामध्ये असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणेही या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदाचा मेळावा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.
शिवसेनेची जाणीवपूर्वक अडवणूक?
मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे. यामुळे आता अप्रत्यक्षरित्या राज्य सरकार म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकार मुंबई महापालिकेचा कारभार हाकत आहे. आम्हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणी घ्यायचा यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. त्यातच शिवसेनेने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने हात आखडता घेतल्याचे कळते.
राज ठाकरे शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळावा घेणार?
शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसरा मेळावा घ्यावा, असे सूचक ट्विट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. "बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार असं म्हणत 'यू टर्न' आणि 'बंडखोर' असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगते ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता त्यापैकी कुणातच नाही. ज्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील मराठी भूमिपूत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टाचा विषय ठरत आहे, याहून मोठी शिकांतिका ती कोणती?", असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे.
"वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शि व से ना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण. हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी मार्गाला मार्गदर्शन करावे,", असे आवाहन संदीप देशपांडे यांनी केले आहे.
शिवाजी पार्क मैदानासाठी सदा सरवणकरांचा अर्ज
"मी कुठला गटाचा तटाचा नाही. मी शिवसेनेचा आमदार आहे. गेली 15 वर्षे आमदार म्हणून मीच दसरा मेळाव्यासाठी अर्ज करतो. त्यानुसार मी यावर्षी देखील अर्ज केला आहे. दसरा मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन एकनाथ शिंदे यांचे असेल. मी शिवसेना म्हणूनच अर्ज केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार दसरा मेळाव्यात दिले जातील. दोन अर्जातील एक अर्ज निवडावा लागेल. मी प्रत्येक वर्षी अर्ज करतो. त्यामुळे मला परवानगी मिळावी, अशी आमची भावना आहे", अशी भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली आहे.