
मुंबई (हिं.स.) : राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात मार्गी लागला. त्यानंतर या आधी जाहीर केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची जुनी सोडत रद्द केली असून नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेसह राज्यातील १३ महापालिकांचा आरक्षण सोडतीचा नवीन कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
पुढील आठवड्यात जाहिरात काढण्यात येणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अंतिम आरक्षण सोडत निघणार आहे. असे असले तरी अनुसुचित जाती आणि जमातीचे आरक्षण कायम ठेवून महिलांचे आरक्षण रद्द करण्यात येणार आहे.
राज्यातील मुंबई महापालिकेसह १३ महापालिका निवडणुका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम ३१ मे रोजी जाहीर झाला होता. यासाठी आरक्षण सोडतही निघाली होती. १३ महापालिकांमध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या महापालिकांचा समावेश आहे.