Thursday, May 8, 2025

देशमहत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्या स्कूलबसमधील ३० बालकांची सुखरूप सुटका

पुराच्या पाण्यात अडकलेल्या स्कूलबसमधील ३० बालकांची सुखरूप सुटका

मेहबूबनगर (हिं.स.) : तेलंगणातील मेहबूबनगर जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना शुक्रवारी घडली. मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या या बसमधील सर्व ३० मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. हा सर्व प्रकार सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला.

यासंदर्भातील मेहबूबनगरच्या पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मेहबूबनगर शहरातील भश्याम शाळेची बस रामचंद्रपूरम, मचनपल्ली, सुगुरगद्दाफी तांडा येथून मुलांना घेऊन भश्याम टेक्नॉलॉजी स्कूलच्या दिशेने निघाली होती. मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यानच्या रेल्वेच्या अंडरब्रिजमध्ये बुडाली. पाणी इतके खोल असेल आणि त्यात बस अडकेल, याची चालकाला कल्पना आली नाही. चालकाने बस पुढे नेली आणि ती पुराच्या पाण्यात अडकली आणि हळूहळू बुडू लागली. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी तत्परता दाखवून मदतीचा हात पुढे केला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये लोक शाळकरी मुलांना बसमधून बाहेर काढताना दिसत आहेत. तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली.

महबूबनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यभर मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. जगतियाल, राजन्ना सिरसिल्ला, करीमनगर, पेड्डापल्ली, वारंगल (ग्रामीण), आणि वारंगल (शहरी) यासह काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रंगारेड्डी, मेडचल-मलकाजगिरी, यदाद्री-भोंगीर, कामरेड्डी, जानगाव, राजन्ना सिरसिल्ला आणि जगतियाल यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस झाला. निजामाबाद जिल्ह्यातील मेंदोरा येथे ५ जुलै रोजी सर्वाधिक १०८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Comments
Add Comment