Monday, May 5, 2025

कोकणसिंधुदुर्ग

मुसळधार पावसामुळे वैभववाडीत रेल्वे रुळावर पाणी; वाहतूक संथ गतीने

मुसळधार पावसामुळे वैभववाडीत रेल्वे रुळावर पाणी; वाहतूक संथ गतीने

सिंधुदुर्ग (हिं.स.) : वैभववाडी तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. वैभववाडी रेल्वे स्टेशन नजीक रुळावर पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू होती. वैभववाडी–तळेरे मार्गावर ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली होती. त्याचबरोबर उंबर्डे–वैभववाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पावसाचा फटका करुळ घाटमार्गाला देखील बसला. करुळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. मात्र वाहतूक सुरू आहे.

वैभववाडी तालुक्यात पावसाने आज दाणादाण उडविली. तालुक्यातील सुख व शांती या प्रमुख नद्या चालू वर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत होत्या. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका रेल्वे प्रशासनालाही बसला. वैभववाडी रेल्वे स्टेशन नजीक रुळावर पाणी भरले होते. दोन्ही रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. मात्र काही काळाने पाणी ओसरले. त्याचबरोबर तळेरे – वैभववाडी मार्गावर घंगाळे नजीक रस्त्यावर पाणी आले होते.

त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. वैभवाडी – उंबर्डे मार्गावर सोनाळी नजीक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र दुपारनंतर वाहतूक पुर्ववत झाली. करुळ घाटाला पावसाचा सर्वात जास्त फटका बसला. पावसात घाटातील गटारे मातीने भरून गेल्याने ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मात्र मार्ग चालू होता. नापणे येथील एका घरात पाणी घुसल्याने घरातील व्यक्तींची तारांबळ उडाली. सायंकाळी पावसाचा जोर ओसरला. त्यानंतर जनजीवन सुरळीत झाले.

Comments
Add Comment