Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद

नाशिक (हिं.स.) : नाशिक शहरातील सातपूरच्या अशोकनगर परिसरात आज सकाळी बिबट्या एका घराच्या अडगळीच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेला दिसून आला. याठिकाणी अनेकांनी बिबट्या बघण्यासाठी गर्दी केली. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासन तात्काळ हजर झाले.

ऐन लोकवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने सगळीकडे पळापळ सुरु झाली होती. वनविभाग आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बिबट्याचे प्रथमतः लोकेशन तपासण्यात आले. अगदी शिताफीने हा बिबट्या सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नाअंती जेरबंद करण्यात आला. चार तासांच्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. परिसरातील नागरिक दरवाजे खिडक्या बंद करून घरात बसलेले होते तर काही लोक बघ्यांच्या गर्दीत सामील झालेले होते.

नाशिक शहरातील सातपूर कॉलनी अशोकनगर परिसर कामगारांचा आहे. याठिकाणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत करणारे कर्मचारी या भागात राहतात. आज कामगारांचा सुट्टीचा दिवस दिवस होता. मात्र, सकाळीच बिबट्या दिसल्याच्या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. बिबट्या पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा लावत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले. जवळपास चार तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Comments
Add Comment