Thursday, May 8, 2025

देशमहत्वाची बातमी

यशवंत सिन्हा लढवणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक

यशवंत सिन्हा लढवणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक

कोलकाता : माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते , हे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. विरोधी पक्षांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सिन्हांच्या उमेदवारीची घोषणा केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आगामी २५ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सत्ताधारी एनडीएतर्फे एम. व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. तर युपीए आणि इतर विरोधकांकडून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

सिन्हा यांनी मंगळवारी सकाळीच ट्वीट करत ममता बॅनर्जींना धन्यवाद देत पक्ष कार्यापासून अलिप्त होण्याची घोषणा केली होती.

https://twitter.com/YashwantSinha/status/1539107126026584064

त्यामुळे सिन्हा यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास पक्के झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, त्यावर एकमत होऊ शकले नव्हते. इतर विरोधी पक्षांनी शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देऊ केली, परंतु तिन्ही नेत्यांनी ही ऑफर नाकारली.

त्यानंतर मंगळवारी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी सिन्हांच्या उमेदवारीची घोषणा केली. अटल बिहारी बाजपेयींच्या कार्यकाळात भाजपमध्ये असलेल्या सिन्हा यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी होती. आपल्या कार्यकाळात त्यांना अनेक निर्णय बदलावे लागले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याकाळी सिन्हा यांना ‘मिस्टर यू-टर्न’ असे म्हंटले जात असे.

Comments
Add Comment