Tuesday, May 6, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल - चंद्रकांत पाटील

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल - चंद्रकांत पाटील

मुंबई (हिं.स) : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद निवडणुकीसाठी नियोजन पूर्ण झाले असून राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल आणि पक्षाचे सर्व पाच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने राजकीय भूकंप झाला. तसाच आताही होईल. विजयाचा गुलाल भाजपाच उधळेल. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत पाच वर्षे मुख्यमंत्री असताना आमदारांना आपुलकीची वागणूक दिली. त्याचे रुपांतर विधान परिषद निवडणुकीत मतांमध्ये होईल.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिळा मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर वारकऱ्यांच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यावेळी सूत्रसंचालकाने त्यांना भाषण करण्यासाठी विनंती केली असता मा. मोदी यांनी शेजारी बसलेल्या अजित पवार यांना सांगितले की, त्यांनी आधी बोलले पाहिजे. परंतु, आपण भाषण करणार नाही, असे आपण आधीच सांगितले असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. आपण व्यासपीठावर शेजारी असल्याने हा संवाद ऐकायला मिळाला. त्यामुळे अजित पवार यांचे देहूच्या कार्यक्रमात भाषण झाले नाही, याविषयी अनावश्यक वाद निर्माण केला गेला आहे. सामान्यांना यातील राजकारण कळते. प्रत्येक विषयात राजकारण करू नये.

त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत असल्याने त्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे चालू असलेले आंदोलन म्हणजे संविधानाचा अवमान आहे. स्वायत्त तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत काम करत असताना त्याला विरोध करणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष संवैधानिक रचना, केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायसंस्था, कायदेशीर कारवाई याविषयी सामान्यांच्या मनात संशय निर्माण करत आहे. हा बेबंदशाही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

Comments
Add Comment