
मुंबई (प्रतिनिधी) : मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही ठिकाणी राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या २४ तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली असून हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, बीडसह, वर्धा, उस्मानाबाद, नजिकच्या शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
या संपूर्ण आठवड्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागांतही पुढच्या ४ दिवसांत गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात मंगळवारी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढग दाटून आले असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सध्या वर्धा शहरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. जोरदार आलेल्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली. वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलमोहरचे मोठे झाड कोसळल्याने रस्ताच बंद झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसभरात जाणवत असलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. सोमवारपासूनच हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला होता. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सातारा, बीडसह, वर्धा, उस्मानाबाद, नजिकच्या शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून लगतच्या काही भागांतही पुढच्या ४ दिवसांत गडगडाटासहसह पावसाची शक्यता आहे.
शेतीच्या कामांना वेग
दरम्यान, राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.
मान्सून १०३ टक्के होण्याचा अंदाज
यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आहे. साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून या वर्षी २९ मे रोजीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने जून महिन्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मान्सून सामान्य असणार आहे. तर, दीर्घकाळासाठी १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटक, तामिळनाडू, कोकण आणि गोव्यात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. पुढील २ ते ४ दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या ९६ टक्के ते १०४ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मे महिन्यात अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले. देशातील उर्वरित भागातही वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.