Thursday, May 8, 2025

महामुंबई

पर्यटनस्थळांवर लसीकरणाला सुरुवात

पर्यटनस्थळांवर लसीकरणाला सुरुवात

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईतील पर्यटन स्थळांवर शनिवारपासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आठ पर्यटन स्थळांवर लसीकरण सुरू झाले आहे. प्रामुख्याने दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरातील गेट वे ऑफ इंडिया, काळाघोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, अंधेरीतील महाकाली गुंफा, आरे वसाहतीतील छोटा काश्मिर बोटींग क्लब, कुर्ला येथे स्नो वर्ल्ड फिनीक्स सीटी आणि घाटकोपरमध्ये किडझानीया आरसीटी मॉल अशा आठ ठिकाणी पर्यटकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

या लसीकरणात कोविशील्ड लस विचारात घेता, १८ वर्षांवरील पात्र नागरिकांसाठी पहिली मात्रा / दुसरी मात्रा, आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी तसेच ६० वर्षांवरील नागरिक यांच्यासाठी प्रतिबंधात्मक मात्रा देखील दिली जाणार आहे. तर कोवॅक्सीन लस विचारात घेता, १५ वर्षांवरील पात्र व्यक्तींसाठी पहिली मात्रा / दुसरी मात्रा, आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी तसेच ६० वर्षांवरील नागरिक यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) दिला जाईल.

तसेच, १२ ते १५ वर्षे वयोगटातील पात्र मुलांकरीता कोरबेवॅक्स या लसीची पहिली मात्रा / दुसरी मात्रा दिली जाईल. या आठही ठिकाणी सर्व लसी स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे देण्यात येतील. या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर लसीकरण सुरू केल्याने लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, विशेषत: लहान मुलांचे लसीकरण अधिकाधिक संख्येने होईल अशी खात्री पालिकेला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment