Friday, May 9, 2025

रायगड

उरणमध्ये स्वच्छतेचे 'तीनतेरा'

उरणमध्ये स्वच्छतेचे 'तीनतेरा'
  • भररस्त्यात सुया, इंजेक्शन
  • कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी
  • याप्रकरणी अधिकाऱ्यांचे मौन

उरण (वार्ताहर) : उरण नगरपालिकेच्यावतीने स्वच्छ उरण, सुदंर उरण करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे. हा सर्व खटाटोप सुरू असताना ज्याठिकाणी कचरा टाकू नये असा बोर्ड लावला आहे त्याच ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकून स्वच्छ उरण, सुंदर उरणच्या संकल्पाला हरताळ फासले आहे.

पॅथॉलॉजीमधील कचरा भररस्त्यात टाकला जात आहे. याकडे लक्ष देण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळ नाही. उरण शहरातील आरोग्य विभागाची ज्यांच्याकडे जबाबदारी असे आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे कोणत्याही गोष्टींची माहिती विचारली असता ते सरळ सरळ मी माहिती देऊ शकत नाही, तुम्ही साहेबांना विचारा असे सांगून आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे आरोग्याची समस्या बिकट होत चालली आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीची कमिटी शहराची पाहणी करण्यासाठी उरण शहरात आली होती. त्यावेळी राजपाल नाका येथील मुतारी आतमध्ये व्यवस्थित करून बाहेरून बाटलीच्या साह्याने कामगार पाणी सोडताना दिसत होते. कमिटी पाहणी करून गेल्यानंतर पुन्हा मुतारीची परिस्थिती जैसे थे. सध्या त्याठिकाणावरून ये-जा करताना उग्र वासाने नाक मुठीत धरून जावे लागते. उरणमधील अनेक पॅथॉलॉजीमधील सुया व इंजेक्शन भररस्त्यात टाकले जात आहे. याबाबत नगरपालिका अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता तुमचा याबाबत काहीतरी गैरसमज होत असल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेतात.

Comments
Add Comment