
- मेरिटाइम बोर्ड, पुरातत्व विभागाचे निर्देश
- आजपासून ऑगस्टपर्यंत राहणार बंद
मुरूड (वार्ताहर) : पावसाळा जवळ आल्याने मुरुडचा सुप्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग किल्ला गुरुवार (ता. २६) पासून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती मुरूड येथील पुरातत्व खात्याचे अलिबाग-मुरुडचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवतात. यातून कुणाचाही आनंद हिरावून घेण्याचा अथवा कुणाचेही नुकसान करण्याचा हेतू नाही, अशी माहिती येलीकर यांनी दिली.
उन्हाळी सुट्टी असल्याने जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. प्रतिवर्षी ५ लाख पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येतात. २२ एकरवर उभा असणाऱ्या जंजिऱ्यावर १९ बुरुज आहेत. पूर्वी ५१४ तोफा होत्या. त्यातील आता मोजक्याच दिसून येतात. इतिहासात जंजिरा हा अजिंक्य किल्ला अशी नोंद असल्याने जंजिरा पाहण्याचे पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण असते. जंजिरा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील बोटचालक, लाँच मालक यांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन आहे. त्यामुळे जंजिरा खुला असणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी...पावसाळा जवळ आला की, समुद्रातील वातावरण बदलत जाते. उसळणाऱ्या लाटा किल्ल्याच्या तटबंदीवर धडकतात. अशावेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. किल्याकडे जाताना एखादी दुर्घटना घडल्यास ही जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण होतो. त्यापेक्षा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरातत्व विभागकडून जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद ठेवण्यात येतो, अशी माहिती येलीकर यांनी दिली.