Monday, May 5, 2025

विशेष लेख

मातृहृदयी सौ. निलमताई

मातृहृदयी सौ. निलमताई

हर्षदा वाळके

असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, खंबीरपणे प्रत्येक सुखदुःखात साथ देणारी. जिच्या नुसत्या सोबत असण्याने देखील पुरुष यशाची उत्तुंग शिखरे चढत जातो. काही स्त्रिया नुसत्या सोबत चालत नाहीत, तर त्याच्या प्रत्येक कामात हिरिरीने खांद्याला खांदा लावून सक्रियपणे काम करतात व खऱ्या अर्थाने सहचारिणीचे कर्तव्य निभावतात. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या मार्गदर्शक सन्मा. सौ. निलमताई नारायणराव राणे. सर्वांच्या लाडक्या वहिनीसाहेब.

उत्कृष्ट पत्नी, संस्कारक्षम माता, कुशल व्यवस्थापक व संवेदनशील समाजसेविका अशी त्यांची ख्याती आहे. खरं तर सन्मा. राणेसाहेबांनी राजकारणात अनेक पदे भूषविली. नगरसेवक पदापासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख सतत उंचावत राहिला. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते आज केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री पदापर्यंतचा उत्तुंग प्रवास थक्क करणारा आहे. या सर्व प्रवासात ताई नेहमीच सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या दिसतात.

घर आणि समाजकारण यांचा उत्तम मेळ साधत त्यांनी कर्तव्यनिष्ठेने सहचारिणीची भूमिका उत्कृष्टपणे निभावली आहे. निलमताईंनी निलेशसाहेब व नितेशसाहेब यांच्या रूपाने संस्कारी संवेदनशील नेते जिल्ह्याला दिले.

त्यांच्यासारखे कुशल नेतृत्व त्यांनी घडवले. त्यांचे दोन्ही सुपुत्र आज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण व समाजकारणात यशस्वीपणे घोडदौड करताना दिसतात, त्याचे पूर्ण श्रेय ताईंना जाते. राजकारण्यांच्या स्त्रिया सहसा सामाजिक जीवनात फारशा सक्रिय असलेल्या दिसत नाहीत. पण आमच्या निलमताई वेगळंच रसायन आहेत. ताईंनी आई, पत्नी, ही भूमिका साकारत असतानाच कुशल व्यवस्थापकाची जबाबदारीही लीलया पेलली. ताई मुळातच संवेदनशील स्वभावाच्या. त्यामुळे समाजातील लोकांसाठी विशेषतः महिलांसाठी काही तरी करावं या उद्देशाने त्यांनी सिंधुदुर्ग महिला भवन उभारले आणि अनेक महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली.

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या यशस्वीपणे काम पाहत आहेत. इंजिनीअरिंग काॅलेज व मेडिकल कॉलेजचं व्यवस्थापनही त्या पाहतात. या क्षेत्रात त्यांची निर्णय क्षमता वाखाणण्याजोगी आहे. अनेक हाॅटेल्सचे व्यवस्थापनाची जबाबदारी ही त्या ताकदीने पेलताना दिसतात.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ताईंनी अंगणवाडी सेविकांची संघटना बांधणी सुरू केली आहे. त्यातही त्या जातीने लक्ष देतात. निवडणुकीच्या प्रचारात त्या सक्रियपणे सहभागी होताना दिसतात. महिलांचे वेळोवेळी मेळावे घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेताना, मार्गदर्शन करताना दिसतात.

महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गळ्यातील त्या ताईत आहेत. सर्वांसाठी आदर्श आहेत. “काय गं कशी आहेस? बरी आहेस ना?” या सुहास्यवदनाने त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाने कार्यकर्त्या सुखावतात. त्या नेहमीच सर्वांच्या आधारस्तंभ आहेत.

या आदर्श नेतृत्वाला माझा मानाचा मुजरा!!

Comments
Add Comment