
नालासोपारा : एका नायजेरियन नागरिकाचा खून करून बांगलादेश सीमेमार्गे भारतातून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा नायजेरियन आरोपींना २४ तासात पकडले. महाराष्ट्र व मेघालय पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. मेघालयातील शिलॉंग येथून वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सहाजणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सर्व आरोपींना शनिवारी शिलॉंगच्या स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची ट्रान्झिट रिमांड घेऊन ते वसईला येत आहेत. मृत व्यक्ती हा नायजेरियन कम्युनिटीमध्ये एका पदावर होता. त्या मृत व्यक्तीने कम्युनिटीमध्ये काही आर्थिक अफरातफर केल्याचा आरोपींना संशय होता. या संशयातून त्याचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत व्यक्तीचे ३ मे रोजी नालासोपारा येथील राहत्या घरातून अपहरण केले होते. त्यानंतर ४ मे रोजी नायगावमध्ये एका फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळला. यावेळी या फ्लॅटमध्ये राहणारे तीन नायजेरियन घर सोडून गेल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना मयताच्या घराजवळचा सीसीटीव्ही हाती लागला. या सीसीटीव्हीमध्ये सहा नायजेरियन मृत व्यक्तीला जबरदस्तीने घरातून बाहेर काढत मारहाण करीत चारचाकी गाडीतून घेऊन जात असल्याचे दिसले.
दरम्यान, आरोपी देश सोडून जाऊ नये म्हणून तात्काळ लुक आऊट नोटीस जारी केली. आरोपी गुवाहाटी-चेरापुंजी-शिलाँग-डावकीमार्गे बांगलादेश येथे पळून जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मेघालय पोलिसांनी सहा आरोपींना ६ मे रोजी ताब्यात घेतले. महाराष्ट्र पोलीस आणि मेघालय पोलिसांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईमुळे सहाही जणांना २४ तासांच्या आत अटक केली.