Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

उल्हासनगरच्या सोंग्याच्या वाडीत बिबट्याचा वावर

उल्हासनगर : उल्हासनगरच्या सोंग्याच्या वाडीत बिबट्याचा वावर दिसून आल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वर्षीय मुलगी या जंगलात गेली होती आणि तेव्हा तिला हा बिबट्या निदर्शनास आला. तात्काळ तिने त्या ठिकाणावरून पळ काढला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिक आणि पोलिसांना मिळताच वनविभागाला बोलविण्यात आले. सद्या सोंग्याच्या वाडीत वनविभागाच्या वतीने शोध कार्य सुरू असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

अंबरनाथ शहरालगतच्या ग्रामीण भागात महिनाभरात बिबट्याकडून तब्बल ६ प्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. तसेच मागील आठवड्यात अंबरनाथच्या ऑर्डनस फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला होता. आता हा बिबट्या रोड ओलांडून उल्हासनगरच्या दिशेने वाटचाल करत आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन सुभाष टेकडीकडे जाणाऱ्या सोंग्याच्या वाडीत हा बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने मागील अनेक महिन्यांपासून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी विनाकारण रात्रीच्या सुमारास घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान वनविभागाच्या वतीने परिसरात बिबट्याच्या पायाचे निशाण आढळून आल्यावरच बिबट्या आहे की नाही हे समजू शकणार आहे. उद्या पुन्हा वनविभागाच्या वतीने या परिसरात शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

Comments
Add Comment