Tuesday, May 6, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

एसटी सुरू झाली पाहिजे-शरद पवार

एसटी सुरू झाली पाहिजे-शरद पवार

मुंबई : एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. आता हा प्रश्न सुटावा, यातून मार्ग निघावा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि कर्मचारी कृती समिती यांच्यात चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली.

या पत्रकार परिषदेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "परिवहन मंत्री आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी कृती समितीसोबत चर्चा केली. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा प्रवासी आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली तिचं वर्णन न केलेलं बरं. दुसरं एक संकट देशावर आलंय, ते कोरोनाचा नवा अवतार आपण पाहत आहोत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होत आहे. असा परिणाम होत असतानाही राज्य सरकारला कामगारांना योग्य मोबदला देण्याची, आर्थिक किंमत देण्याची स्थिती असताना सुद्धा माझ्या मते परिवहन मंत्र्यांनी जेवढं जास्त करता येईल तेवढं कामगारांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न याठिकाणी कृती समितीच्या लोकांसमोर मांडल्यानंतर कृती समितीचेही काही प्रश्न आहेत, सरकारच्या निर्णयामध्ये काही कमतरता आहेत, हे कृती समितीने निदर्शनास आणून दिलं. त्याही बाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्रीमहोदयांनी दिली."

ही तयारी करत असताना एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी सेवेत यायला हवं, तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत, त्याबाबत आपण सकारात्मक मार्ग काढू शकतो असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. 

Comments
Add Comment