
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असली तरी लोकल बंद करणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरी कोणतीही लक्षणं नसलेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लोकल बंद करण्यासंदर्भात आज कोणतीही चर्चा झालेली नाही.. संपूर्ण परिस्थितीवर ते लक्ष ठेवून असतात.
आज फक्त निर्णयांची अंमलबजावणी कशी सुरू आहे आणि आणखी काय करता येईल याबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं, असे टोपे यांनी सांगितले. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काल बैठक झाली. यात पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला काही सूचना केल्या असल्याचं टोपे यांनी यावेळी म्हटले.
लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असेही टोपे यांनी म्हटले आहे. रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी एकूण रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण कोणतेही लक्षणं नसलेले रुग्ण आहेत. यात बहुंताश रुग्णसंख्या घरीच क्वारंटाइन असल्याचंही आकडेवारीवरुन दिसून येतं. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही विचार नाही. विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू संदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे. त्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे राजेश टोपे म्हणाले.