Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

मुंबई-आग्रा महामार्गाला कचऱ्याचा विळखा

मुंबई-आग्रा महामार्गाला कचऱ्याचा विळखा शहापूर  : मुंबई-आग्रा महामार्गालगत पडघा ते कसारा दरम्यान रस्त्यालगत दोन्ही बाजूस कचऱ्याचा वेढा पडल्याने या कचऱ्यावर उंदीर, घुशी, डुकरांचा मुक्त संचार सुरू असतो, तर कुजलेल्या कचऱ्याने नागरिकांसोबत प्रवाशांना दुर्गंधीचा सामाना करावा लागत आहे. याबाबत महामार्ग प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रामुख्याने महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायतीकडे हक्काचे डम्पिंग ग्राऊड नाही, त्यामुळे बहुतांशी ग्रामपंचायती कचऱ्याची विल्हेवाट महामार्गालगत लावताना दिसतात. अगदी खडावली फाट्यापासून ते वासिंद, आसनगांव, शहापूर, खर्डी, कसाराजवळील महामार्गालगत अनेक ठिकाणी प्लास्टिक, दुकानातील टाकाऊ पदार्थ, शिल्लक राहिलेले मांस, कोंबडीचे पंख, सडलेली अंडी, हॉटेलमधील शिल्लक राहीलेले अन्न यांची विल्हेवाट लावली जाते. या कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात उंदीर, घुशी, डुकरे फिरताना दिसतात़ तर कुजलेल्या कचऱ्याने दुर्गंधीसोबत विविध आजारांची लागण होत आहे़ हा कचरा टाकण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींना हक्काची जागाच नसल्याने पर्यायी जागा म्हणजे मुंबई-आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूस त्याची विल्हेवाट लावली जात आहे़ यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरण याकडे डोळेझाक करत असल्याने वाहनचालकांसह प्रवासीवर्गात प्रचंड संताप व्यक्त करत आहेत़
Comments
Add Comment